Run, Operate and Manage by Kapil Patil Educational Institute | UGC Recognised as 2(f) 12(B) | Permanently Affiliated to University of Mumbai | Re-accredited 'B' Grade by NAAC (3rd cycle) | AISHE code 34145
१८१९ साली, नेपोलियन बोनापार्टच्या फ्रेंच सैन्यातील एका तोफखान्याच्या कप्तान चार्ल्स बार्बियर (Charles Barbier) यांना एक समस्या जाणवली. रात्रीच्या लढायांमध्ये सैनिकांना संदेश वाचण्यासाठी दिवे लावावे लागत, ज्यामुळे शत्रूला त्यांची जागा उघड होत असे आणि जीवितहानी वाढत असे.
यावरून चार्ल्सला प्रश्न पडला की अशी पद्धत शोधता येईल का की ज्यामुळे रात्रीच्या अंधारातही दिवा न लावता सैनिकांना संदेश वाचता येईल ? त्याने “अंधारात वाचण्याची पद्धत” शोधायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने धातूच्या / कागदाच्या पट्टीवर बारा ठिपक्यांच्या साहाय्याने एक अक्षर लिहिण्याची पद्धत शोधली. पण ही पद्धत फारच किचकट होती. त्यामुळे सैन्याने ती पद्धत नाकारली.
त्यानंतर दोन वर्षांनी एका बारा वर्षाच्या मुलाला कुणाकडून तरी चार्ल्सने शोधलेल्या “अंधारात वाचण्याच्या पद्धती” बद्दल माहिती मिळाली. तो मुलगा लहान असताना त्याच्या वडिलांच्या सोबत काम करत होता. तेव्हा झालेल्या एका अपघातात त्याची दृष्टी गेली होती.
त्याने चार्ल्स ने बनविलेली पद्धत शिकून घेतली. त्यालाही ती पद्धत कठीणच वाटली. पण त्याने ती पद्धत नाकारली नाही. उलट त्यावर काम करण्याचे त्याने ठरवले. पुढील पाच वर्षे त्या मुलाने चार्ल्सची पद्धत सुधारून एक सोपी पद्धत विकसीत केली. त्याने १२ ठिपक्यांऐवजी ६ ठिपक्यांच्या सेलमध्ये अक्षरे, संख्यांचे संकेत विकसित केले. ही नवीन पद्धत सोपी, जलद आणि शिकण्यासही सोपी होती. १८२९ साली त्याने ती पहिल्यांदा प्रकाशित केली, आणि नंतर सुधारणा करत गेला.
त्या मुलाचे नाव होते लुई ब्रेल(Louis Braille). त्याने विकसित केलेली पद्धत म्हणजे “ब्रेल लिपी” आज जगभर वापरली जाते. लुई ब्रेलच्या या ६ ठिपक्यांच्या जादूमुळे लाखो अंध व्यक्तींच्या जीवनात क्रांती झाली. ब्रेल लिपी त्यांच्यासाठी केवळ एक लेखन पद्धत नाही, तर समानतेने जगण्याची संधी देणारी संजीवनी ठरली आहे. ब्रेलमुळे ते शिकू शकले, माहितीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकले आणि सन्मानाने रोजगार मिळवू शकले.
जगाला पुढे नेणारे लोक हेच असतात, ज्यांना प्रश्न पडतो आणि जे त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वर्षानुवर्षे मेहनत करण्याची तयारी ठेवतात. चार्ल्स बार्बियर यांना रात्रीच्या समस्येने प्रश्न विचारण्यास उद्युक्त केले, आणि लुई ब्रेल यांनी दृष्टी नसतानाही भविष्याच्या दृष्टीने अथक पाठपुरावा केला.
प्रश्न पडणे आणि उत्तराचा ध्यास घेणे—या दोन गोष्टी ज्यांना साधता आल्या, त्यांनीच मानवजातीची प्रगती केली आणि जगाला एका नव्या उंचीवर नेले.
(संकलन- श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय, उरण)
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit the library blog for more articles)
श्वेता ऑफिसला जायला निघाली, तेव्हा सगळंच विपरीत घडत होतं. आधी अलार्म उशीरा वाजला, मग गाडीत पेट्रोल संपलं, आणि त्यात भर म्हणून त्या दिवशी ट्रॅफिकही ! ऑफिसमध्ये उशिरा आल्याबद्दल बॉसची बोलणी खावी लागतील याची भीती, ट्रॅफिकचा राग आणि स्वतःबद्दलची चिडचिड या भावनांचा एकत्रित कल्लोळ झाला होता. त्यात आणखीन भर म्हणून अचानक हलकासा पाऊस सुरू झाला. आणि तिचा मूड आणखीनच बिघडला.
आता गाडीत बसून राहण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. श्वेताने गाडीत रेडिओ सुरू केला. पहिलंच गाणं लागलं “सावन बरसे तरसे दिल…क्यो ना निकले घर से दिल”….त्या दोन ओळींनी श्वेताच्या विचारांची दिशा आपोआप बदलली. तिने चक्क दार उघडलं आणि पावसाचा आनंद घेत पाच मिनिटे चालून आली. त्या थंड पावसाच्या थेंबांनी तिचा मूड एकदम बदलून गेला. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि दिवसाची सुरुवात पूर्णपणे बदलली.
ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे आपला मूड बदलण्यासाठी नेहमीच मोठ्या गोष्टींची गरज नसते. काही सोप्या पद्धतींनी आपण आपला वाईट मूड चटकन बदलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या पद्धती…या सर्व पद्धती वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहेत.
१. *शारीरिक हालचाल*
फक्त ५ मिनिटं चालणं किंवा थोडी स्ट्रेचिंग करणं यामुळे आपल्या शरीरात एंडॉर्फिन्स नावाचे रसायन निर्माण होतात. हे ‘हॅपी हार्मोन्स’ आपला मूड चटकन बदलू शकतात. संशोधनानुसार, हलका व्यायाम करणं हे सौम्य डिप्रेशनवर औषधांइतकंच प्रभावी ठरतं.
२. *योग्य श्वासोच्छ्वास*
श्वासोच्छ्वासाचे ४-७-८ श्वास तंत्र वापरा. ४ सेकंद श्वास घ्या, ७ सेकंद रोखून धरा, आणि ८ सेकंद श्वास सोडा. हे तंत्र आपल्या मेंदूला शांत करतं आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी करतं. फक्त २-३ मिनिटांत आपल्याला फरक जाणवू शकतो.
३. *वातावरण बदला*
बाहेर जा आणि नैसर्गिक प्रकाशात थोडा वेळ घालवा. यामुळे सेरोटोनिन वाढतं.
दुसऱ्या खोलीत जा. अगदी छोटासा बदल देखील मूड बदलण्यास मदत करतो.
निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवा, याचा सकारात्मक प्रभाव लगेचच आपल्या मूड वर दिसून येतो.
४. *संगीताचा वापर*
आवडतं, उत्साही संगीत ऐका. २-३ मिनिटं संगीत ऐकल्याने डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढतं.
गाणं म्हणा किंवा गुणगुणा. यामुळे व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेट होते आणि शरीर रिलॅक्स होतं.
५. *सामाजिक संपर्क*
मित्र किंवा कुटुंबीयांना फोन करा किंवा चॅट करा. यामुळे ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन वाढतं.
छोट्याशा सकारात्मक संभाषणाने देखील मूड बदलू शकतो.
६. *संवेदना रीसेट करा*
चेहऱ्यावर थंड पाणी मारा (डायव्हिंग रिफ्लेक्स सक्रिय होतो)
अरोमाथेरपी वापरा (लॅव्हेंडर किंवा चिट्रसचा गंध मूड सुधारतो)
बर्फाचा तुकडा हातात धरा किंवा थंड पाण्याने आंघोळ करा.
लक्षात ठेवा, आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा त्यावरील प्रतिक्रिया बदलणे हेच आपल्या हिताचे असते.
वरील सर्व टिप्स प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टी काम करू शकतात. म्हणून वेगवेगळ्या पद्धती वापरून बघा आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे ते शोधा.तसेच या वैज्ञानिक संशोधनावर आधारित असल्या तरी, त्या वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाहीत. गंभीर मानसिक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
राहा आनंदी… Be happy… 😄
(संकलन- श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण)
लायब्ररी हेल्प लाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles)
चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूला कौरवांनी कपटाने मारले. यात पुढे असलेल्या जयद्रथाचा दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली. तेव्हापासून जयद्रथ घाबरला. कौरव गटात जयद्रथाला संध्याकाळ पर्यंत वाचवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली.
द्रोणाचार्य सेनापती होते. तेच अर्जुन आणि जयद्रथाचे गुरु देखील होते.
घाबरलेला जयद्रथ रात्री द्रोणाचार्यांच्या तंबूत गेला आणि त्याने द्रोणाचार्यांना विचारले की मी अर्जुनाला कसा हरवू शकतो?
द्रोणाचार्यांनी सांगितले की तुला जिवंत रहायचे असेल तर उद्या अर्जुनासमोर जाऊ नकोस. उद्या त्याला थोपवायचं कसं ते आम्ही पाहू. द्रोणाचार्यांच्या उत्तराने व्यथित झालेला जयद्रथ म्हणाला “गुरुजी मी आणि अर्जुन आम्ही दोघेही तुमचे शिष्य. जशी त्याने धनुर्विद्या तुमच्याकडून शिकली तशीच मीही तुमच्याकडूनच धनुर्विद्या शिकलो. मग असं काय झालं की आज तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे आणि मला त्याच्यापासून लपावं लागत आहे?
द्रोणाचार्यांनी सांगितलं जयद्रथा, तुम्ही दोघेही माझे शिष्य. मी दोघांनाही समभावानेच शिकवलं. पण तू मी शिकवले ते अंतिम मानून सराव करायचास आणि अर्जुन मी शिकविले ती सुरुवात मानून सराव करायचा. तो त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा, खोलात जायचा, प्रयोग करायचा, त्याचं कधी समाधान व्हायचंच नाही.
माझ्याकडील शिक्षण झाल्यावर तू पूर्णपणे राज्यकारभारात गुंतलास. पण अर्जुन इतर अनेक गुरूंकडून शिकतच गेला. नवनवीन अस्त्रे आपल्या भात्यात समाविष्ट करत गेला.
थोडक्यात अर्जुन श्रेष्ठ आहे कारण त्याची शिकण्याची आणि सरावाची जिज्ञासा वाढत गेली आणि तुझी शिकण्याची इच्छा कमी कमी होत गेली.
आता आपण ज्याच्यासोबत लढत आहोत तो अर्जुन माझा विद्यार्थी काही काळासाठी होता…पण तो धनुर्विद्येचा विद्यार्थी कायमचा आहे.
ज्याने शिकणं संपवलं तो संपलाच म्हणून समज !…
म्हणून मित्रहो, आपण कोणत्याही वयाचे असो आपण कायम विद्यार्थी असणे महत्वाचे..सतत काही ना काही शिकत राहिले पाहिजे 👍
OpenAI ने नुकताच एक मोठी अपडेट जाहीर केली. त्यांनी काही अँप्स थेट चॅटजीपीटी मध्ये समाविष्ट केले आहेत. canva , spotify सारख्या अँप्स बरोबर आता थेट चॅटजीपीटी मधूनच काम करता आहे येणार आहे.
हे अँपल आणि गुगल यांच्या अँप्स स्टोअर साम्राज्यासाठी मोठं आव्हान आहे. या दोन्ही कंपन्या अँप स्टोअर मधून बक्कळ पैसे कमवत आहेत. ते मार्केट OpenAI आता स्वतःकडे खेचत आहे.
पण एका वेगळ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे –
अँप स्टोअर आणि चॅटजीपीटी स्टोअर मध्ये एक मूलभूत फरक आहे. अँप स्टोअर ऍप्समध्ये ढवळाढवळ करत नाहीत. चॅटजीपीटी मात्र अँप स्टोअर कसे वापरायचे हे ठरवत आहे. अँप मध्ये वेगवगेळी बटणे दाबण्यापेक्षा आता थेट तुम्ही अँप्स सोबत ChatGPT मार्फत बोलू शकता.
AI बऱ्याच गोष्टी नष्ट करत आहे. पण त्याचा पहिला घाला पडतोय तो बटणांवर. तो दिवस दूर नाही जेव्हा सर्व ऍप्सची सर्व बटणे निघून त्याजागी केवळ चॅट बॉक्स असेल. हळूहळू बटणे ऍप्स मधून जातील. मग हळूहळू अँप्स फोन मधून जातील. कोणतेही विशिष्ट अँप ओपन करण्याऐवजी आपण फोनबरोबर चॅट करून पाहिजे ते काम करून घेऊ शकतो.
पण हे इथेच थांबणार नाही. हळूहळू फोनची देखील आवश्यकता राहणार नाही. काही टाईप करण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईल स्क्रीन डोळ्यावरील चष्म्यामध्ये येईल. आपण केवळ आवाजाने किंवा हातवारे करून ते नियंत्रित करू शकू.
स्टिव्ह जॉब्स ने जेव्हा झेरॉक्सच्या लॅब मध्ये कम्प्युटर माउस पहिला. तेव्हा त्याने ती कल्पना लगेच चोरली. असंख्य बटणांऐवजी आता केवळ तीन बटनांवर संगणक वापरता येईल आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक संगणक वापरतील हे त्याने हेरले. पुढे स्मार्ट फोनमध्ये पण त्याने तेच केले. नोकिया किंवा ब्लॅकबेरीच्या फोनमधील बटणेच काढून टाकली. ज्यांना फोन वापरणे किचकट वाटत होते अचानक फोन त्यांच्यासाठी सोपा झाला.
Open AI चा सॅम अल्टमॅन किंवा मेटा चा मार्क झुकरबर्ग आता तेच करू पाहत आहेत. आपल्याला मशीन बरोबर बोलता यावं म्हणून तयार झालेली बटणं . आता आपल्याला थेट मशीन बरोबर बोलता येतंय म्हणून पहिला जॉब या बटणांचाच जाणार आहे !!
(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )
“तुम्ही काय करता हे महत्त्वाचे आहे, तुम्ही काय करण्याचा विचार करत आहात हे नाही.” –
— पाब्लो पिकासो
बऱ्याच वर्षांपूर्वी, ‘क्रू’ (Crew) नावाच्या टेक्नॉलॉजी कंपनीचे सह-संस्थापक मिकेल चो (Mikael Cho) यांची कंपनी जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर होती. त्यांच्याकडे फक्त काही महिन्यांपुरतेच पैसे शिल्लक होते आणि त्यांना कंपनी वाचवण्यासाठी काहीतरी करणे भाग होते.
त्यावेळी, त्यांची टीम ‘क्रू’ साठी एका नवीन वेबसाइटवर काम करत होती. वेबसाइटसाठी काही चांगले स्टॉक फोटो शोधताना त्यांना वापरण्यासारखे काहीच सापडले नाही. म्हणून त्यांनी एका कॉफी शॉपमध्ये काही झटपट फोटो काढण्यासाठी एका फोटोग्राफरला कामावर ठेवले. त्यांना फक्त एकाच फोटोची गरज होती आणि काही फोटो अतिरिक्त शिल्लक राहिले होते. म्हणून त्यांनी ते फोटो ऑनलाइन मोफत डाउनलोड करण्यासाठी शेअर करण्याचा निर्णय घेतला.
फक्त तीन तासांत एक साधी टम्बलर (Tumblr) थीम वापरून, त्यांनी ‘अनस्प्लॅश’ (Unsplash) नावाची एक वेबसाइट तयार केली आणि त्यावर त्या अतिरिक्त फोटोंच्या डाउनलोड लिंक्स टाकल्या.
त्यानंतर टीम आपल्या कामाला लागली, कारण त्यांना आपली मूळ कंपनी वाचवायची होती.
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पुढे काय झाले असेल याची कल्पना असेलच. ‘अनस्प्लॅश’ने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. पहिल्याच वर्षात लाखो लोकांनी या वेबसाइटला भेट दिली आणि फोटो डाउनलोड केले. अधिकाधिक लोकांना त्यांचे अतिरिक्त फोटो शेअर करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी ते ‘अनस्प्लॅश’च्या माध्यमातून शेअर केले. अखेरीस, ‘अनस्प्लॅश’ हे ‘क्रू’ कंपनीसाठी प्रसिद्धीचे सर्वात मोठे माध्यम ठरले, ज्यामुळे ‘क्रू’ कंपनी केवळ टिकलीच नाही, तर तिला आवश्यक प्रसिद्धीही मिळाली. काही वर्षांनंतर, लोकांनी ‘अनस्प्लॅश’वर कोट्यवधी फोटो अपलोड केले आहेत. आजही ही वेबसाइट जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या २००० वेबसाइट्सपैकी एक आहे.(पाच वर्षानंतर Unsplash ला न्याय देता यावा यासाठी Crew हा बिझनेस विकून पूर्ण फोकस Unsplash वर करण्यात आला !)
हे सर्व फक्त यासाठी घडले कारण ‘क्रू’च्या टीमने त्यांचे अतिरिक्त फोटो एका साध्या वेबसाइटवर शेअर करण्याचा निर्णय घेतला. त्या टीममधील कोणालाही त्यावेळी कल्पना नसेल की हा छोटासा साईड प्रोजेक्ट त्यांची कंपनी वाचवेल आणि एका पूर्णपणे नवीन कंपनीला जन्म देईल.
शेवटी, गोष्ट फक्त कृती करण्याची आहे. ‘पब्लिश’ बटण दाबण्याची आहे. परिपूर्णतेचा विचार न करण्याची आहे. आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवण्याची आहे.
गोष्ट आहे एखादी कल्पना सुचल्यावर त्यावर लगेच काम करण्याची. काहीतरी तयार करून ते जगासमोर मांडण्याची. एखाद्या दिवशी कदाचित फक्त एकच व्यक्ती तुमच्या कामाचे कौतुक करेल (ते ही ठीकच आहे !), तर दुसऱ्या दिवशी हजारो लोकही करू शकतात. दोन्ही परिस्थितीत ते मोलाचेच आहे.
‘केसी नेस्टॅट’ (Casey Neistat) हे नाव तुमच्यापैकी काहींना कदाचित परिचित असेल. तो एक जगप्रसिद्ध YouTuber आणि व्लॉगर आहे. पण त्याच्या व्लॉगिंग कारकिर्दीच्या अनेक वर्षांपूर्वी, त्याने “क्रेझी जर्मन वॉटर पार्क” नावाचा ३ मिनिटांचा एक व्हिडिओ अपलोड केला होता.
पुढील काही महिन्यांत, या व्हिडिओला केवळ YouTube वर १ कोटी ८० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो त्याचा (त्यावेळचा) सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ ठरला. या व्हिडिओमध्ये तसे काही खास नाही. तो एक चांगला व्हिडिओ आहे, पण तो त्याच्या सर्वोत्तम विडिओपैकी एक नक्कीच नाही. केसी स्वतःही सांगू शकणार नाही की त्याचा तोच व्हिडिओ इतरांच्या तुलनेत इतका व्हायरल का झाला. या व्हिडिओने केसीचे आयुष्य बदलले. या व्हिडिओमुळे त्याच्या चॅनलला आणि इतर व्हिडिओंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
मला खात्री आहे की हा व्हिडिओ इतका यशस्वी होईल याची केसीला स्वतःलाही कल्पना नसेल. कधीकधी आपल्याला आतून जाणीव होते की काहीतरी यशस्वी होणार आहे. पण बहुतेक वेळा, यश अगदी अनपेक्षित कारणांमुळे मिळते. आपल्याला फक्त “क्रेझी जर्मन वॉटर पार्क” सारखा एखादा व्हिडिओ ‘पब्लिश’ करायचा असतो.
तुम्ही लिहिलेला आणि प्रकाशित केलेला एक लेख तुमचे आयुष्य बदलू शकतो. तुम्ही अपलोड केलेला एक व्हिडिओ तुमचे करिअर घडवू शकतो. तुम्ही तयार केलेला एक छोटासा साईड प्रोजेक्ट तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतो.
पण अडचण ही आहे की, आपण या गोष्टी करतच नाही. आपण फक्त नियोजन करत बसतो, रणनीती आखतो, प्रमाणापेक्षा जास्त विचार करतो आणि काम न करण्यासाठी कारणे शोधतो.
अशा अनेक कथा आहेत. यावर विचार केल्यावर भविष्यात आणखी काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते. तुम्हालाही मिळेल या विचाराने हा लेख शेअर करत आहे. पुढे चालत राहा, धावत राहा आणि कामाचा आनंद घ्या.