सिंगापूरच्या प्रगतीची गोष्ट

1960 च्या सिंगापूरची गोष्ट आहे.

आजचं श्रीमंत, आधुनिक सिंगापूर डोळ्यासमोर आणू नका. त्या वेळी सिंगापूर नुकतंच स्वशासित झालेलं छोटंसं बेट होतं. तेल नाही. मोठी बाजारपेठ नाही. मागे विशाल भूभाग नाही. लष्करी ताकदही फारशी नाही.

अशा छोट्या देशाला दबावाखाली आणणं किती अवघड असणार?

अमेरिकेच्या CIA मधील काही लोकांनीही असाच विचार केला.

1960 मध्ये एका CIA एजंटने सिंगापूरच्या Special Branch मधील अधिकाऱ्याकडून गुप्त माहिती विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण तो अधिकारी विकला गेला नाही. त्याने वरिष्ठांना माहिती दिली आणि CIA एजंट पकडला गेला.

आता अमेरिकेसमोर अडचण होती.

ही गोष्ट बाहेर आली, तर मोठी नामुष्की होणार होती.

मग अमेरिकेकडून दुसरा प्रस्ताव आला.

प्रकरण दाबून टाकण्यासाठी ली कुआन यू आणि त्यांच्या पक्षाला सुमारे 3.3 दशलक्ष अमेरिकन डॉलर देण्याची तयारी दाखवण्यात आली.

एका गरीब देशाच्या नेत्यासमोर ही रक्कम ठेवली गेली होती.

ली कुआन यू यांनी ती नाकारली.

पण इथे ही गोष्ट आणखी रंजक होते.

त्यांनी अमेरिकेला साधारण असं सांगितलं—मला किंवा माझ्या पक्षाला पैसे देऊ नका. त्याऐवजी सिंगापूरला आर्थिक विकासासाठी अधिकृत मदत द्या.

त्यांनी सुमारे 33 दशलक्ष डॉलरची औपचारिक development aid मागितली. ती मागणी मान्य झाली नाही.

वैयक्तिक फायद्यासाठी आलेल्या गुप्त पैशाचं रूपांतर देशासाठीच्या अधिकृत मदतीत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

आणि ते शक्य झालं नाही, तरी त्यांनी स्वतःसाठीचे पैसे स्वीकारले नाहीत.

पुढे अमेरिकेचे Secretary of State Dean Rusk यांनी या प्रकरणाची दखल घेत ली यांना पत्राद्वारे माफी मागितली आणि ते प्रकरण तिथेच मिटवलं.

ली कुआन यू यांनी सुरुवातीला काही वर्षे ही गोष्ट गुप्त ठेवली होती. पण ऑगस्ट 1965 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी या घटनेचा जाहीर उल्लेख केला. सुरुवातीला अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने आणि मलेशियातील अमेरिकन राजदूताने हा आरोप फेटाळून लावला. त्यावर क्रोधीत होऊन ली कुआन यू यांनी पत्रकारांना बोलावून डीन रस्क यांचे माफीनामे असलेले गुप्त पत्र पुराव्यादाखल दाखवले आणि रेकॉर्डिंग्स जाहीर करण्याची धमकी दिली. त्यानंतर अमेरिकेला आपला नकार मागे घेऊन गुन्हा कबूल करावा लागला.

त्याच वेळी ली कुआन यू यांनी ठाम शब्दांत अमेरिकेला सुनावले होते:

“They are not dealing with Ngo Dinh Diem or Syngman Rhee. You do not buy and sell this Government.”

(म्हणजेच: “तुम्ही इतर लाचखोर हुकूमशहांशी व्यवहार करत नसून सिंगापूरशी व्यवहार करत आहात. हे सरकार विकत घेता येत नाही आणि विकलेही जात नाही.

एखाद्या देशाची खरी संपत्ती नेमकी कुठे असते?

त्याच्या जमिनीखाली तेल असण्यात?

मोठं सैन्य असण्यात?

की त्याच्या निर्णय घेणाऱ्या माणसांना स्वतःची किंमत आणि देशाची किंमत यातला फरक समजण्यात?

1960 मध्ये सिंगापूरकडे फारसं काही नव्हतं.

पण त्या छोट्या देशाने एक गोष्ट स्पष्ट केली होती—

एखाद्या गरीब देशाकडे पैसा नसतो, सैन्य नसतं, नैसर्गिक साधनसंपत्ती नसते.

पण त्याच्याकडे एक गोष्ट असू शकते जी पैशाने विकत घेता येत नाही— देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा स्वाभिमान ! देशाचा स्वाभिमान !

देश श्रीमंत असो वा गरीब, देशाच्या नेतृत्वाची नैतिक ताकद आणि स्वाभिमानच त्या देशाला महान बनवतात !

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय, उरण )

लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322

( please visit library-blog for more articles )