Category: Library Blog
मोनालिसा
सन १५०३ मध्ये, फ्लॉरेन्स (इटली) येथील एका कलाकाराला स्थानिक व्यापारी फ्रांचेस्को डेल जियाकोंडो यांनी एक काम दिले. त्यांना आपल्या पत्नीचे चित्र बनवायचे होते.
ते चित्र खूप मोठे नव्हते – साधारण A2 पेक्षा लहान आकाराचे. ते एक सर्वसाधारण चित्र होते. त्यात काही विशेष नव्हते.
पण पुढे तो कलाकार नावारूपाला आला आणि म्हणून सुमारे ३०० वर्षांनंतर, १७९७ मध्ये, ते चित्र पॅरिसमधील लूव्र (Louvre) संग्रहालयात इतर मोठ्या चित्रांच्या मधोमध एका भिंतीवर लावण्यात आले.
तेव्हाही ते एक साधारण चित्रच होते. येणारे लोक त्याकडे फारसे लक्ष देत नव्हते.
पण २१ ऑगस्ट १९११ काहीतरी वेगळं घडलं. त्या दिवशी व्हिन्सेंझो पेरुगिया नावाचा एक चोर लूव्रमध्ये आला आणि एका स्वच्छता कक्षात लपून बसला. संग्रहालय बंद झाल्यावर तो बाहेर आला आणि त्याने ते छोटे चित्र भिंतीवरून उतरवले. ते त्याच्या कोटाखाली व्यवस्थित बसले आणि तो शांतपणे ते घेऊन दुसऱ्या दिवशी इमारतीतून बाहेर पडला.
बराच वेळ कोणाला काहीही वेगळं वाटलं नाही. नंतर कुणालातरी आठवलं की त्या दोन मोठ्या चित्रांच्या मधल्या जागेत एक छोटे चित्र असायचे. ते आता तिथे नाही. त्यांना वाटले कदाचित साफसफाईसाठी किंवा चित्राची जागा बदलण्यासाठी ते तिथून काढले असेल.
अखेरीस जेव्हा त्यांना कळले की ते साफसफाईसाठी काढलेले नाही, तेव्हा त्यांना चोरी झाल्याची जाणीव झाली.
पण ही साधी चोरी नव्हती. चोराने बाकीच्या सगळ्या उत्कृष्ट कलाकृतींकडे दुर्लक्ष करून फक्त हे छोटे चित्र नेले होते. याचा अर्थ, भिंतीवर टांगलेल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याचे महत्व जास्त असले पाहिजे !
या घटनेची बातमी वर्तमानपत्रांमध्ये पसरली. सगळ्यांना उत्सुकता होती की हा कोणता असा ‘मास्टरपीस’ आहे, ज्याला इतके महत्त्व देऊन चोरी करण्यात आले आहे. त्या चित्राचे नावही कोणाला ठाऊक नव्हते. लूव्रने तपास केला आणि जाहीर केले की त्या चित्राचे नाव आहे – ‘मोना लिसा’ (The Mona Lisa).
आणि अचानक… सगळ्यांना ‘मोना लिसा’ बघायची ईच्छा झाली ! 🤯
जगातल्या इतर कोणत्याही चित्रापेक्षा चोरण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरलेले हे चित्र आपल्याला बघायलाच हवे! पण ते तिथे नव्हते! आणि तिथे त्या चित्राचे ‘नसणे’ हेच लोकांना ते बघण्याची ओढ अधिक लावत होते.
दोन वर्षांनंतर, तो चोर ते चित्र फ्लॉरेन्समधील एका गॅलरीला विकण्याचा प्रयत्न करत असताना पकडला गेला आणि अखेरीस ‘मोना लिसा’ लूव्रमध्ये परतले. ते चित्र परत आल्यानंतर “मोना लिसा” पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. अल्पावधीतच, ‘मोना लिसा’ जगातील सर्वात प्रसिद्ध चित्र बनले. त्याशिवाय लूव्र संग्रहालय अपूर्ण वाटू लागले.
आज, दरवर्षी सुमारे साठ लाख (६० लाख) लोक फक्त ‘मोना लिसा’ बघण्यासाठी तिथे जातात.
मित्रांनो, या संपूर्ण कथेत जो मानसशास्त्रीय नियम लागू होतो, त्याला ‘विरलता सिद्धान्त’ (Scarcity Heuristic) असे म्हणतात.
जेव्हा एखादी वस्तू, संधी किंवा व्यक्ती सहज उपलब्ध नसते किंवा ती मर्यादित आहे (scarce) असे आपल्याला कळते, तेव्हा आपल्याला त्याची किंमत अचानक खूप जास्त वाटू लागते आणि ती मिळवण्याची इच्छा तीव्र होते.
चोरीमुळे ‘मोना लिसा’ अचानक अनुपलब्ध झाले. त्यामुळे ते इतके मौल्यवान बनले की नंतर ते जगातील सर्वात प्रसिद्ध चित्र बनले.
आपणही उपलब्ध असलेल्या प्रत्येक गोष्टीला ‘होय’ म्हणू लागलो, तर आपली किंमत कमी होते. जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेला (time) ‘मर्यादित’ (scarce) मानून, फक्त महत्त्वाच्या कामांसाठी ‘होय’ म्हणता आणि अनावश्यक गोष्टींना ‘नाही’ म्हणता, तेव्हा तुमच्या सहभागाची किंमत वाढते. तुमचे लक्ष (focus) दुर्मिळ बनल्याने, ते अधिक मौल्यवान ठरते.
तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात खूप खोलवर ज्ञान मिळवता, तेव्हा तुम्ही ‘मर्यादित तज्ज्ञ’ (scarce expert) बनता. तुमचे कौशल्य इतरांना सहज उपलब्ध नसते, ज्यामुळे त्याची मागणी आणि किंमत वाढते.
म्हणूनच लक्षात ठेवा: तुमची खरी किंमत तुम्ही किती उपलब्ध आहात यावर नाही, तर तुम्ही किती खास (Rare) आहात आणि तुमच्याकडे किती मूल्यवान ज्ञान आहे यावर ठरते!
(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )
कॉमन सेन्स !
अठराव्या शतकामध्ये कॅलिफोर्निया मध्ये गोल्ड रश होती. गोल्ड रश म्हणजे सोन्याच्या खाणी शोधून सोनं काढण्यासाठी पूर्ण अमेरिकेतील लाखो लोकांनी कॅलिफोर्निया आणि आसपासच्या भागांमध्ये गर्दी केली केली होती. साधारण 3,00,000 खाण कामगार तेव्हा वेगवेगळ्या भागातून आले होते.
लेव्ही स्ट्रॉस आणि त्याचा मेहुणा डेविड स्टर्न यांना लक्षात आले की एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या कामगारांना कपडे, ब्लांकेट्स, जॅकेट, बटन, कात्र्या इत्यादी वस्तू लागतील. त्यांनी अशा विविध प्रकारच्या उपयोगी वस्तू आसपासच्या दुकानांमध्ये जाऊन विकायला सुरुवात केली.
एवढेच नव्हे तर घोड्याच्या पाठीवर सर्व सामान लादून त्यांनी थेट कामगारांना गाठून विकायला पण सुरुवात केली. या खाण कामगारांशी बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की सर्व कामगारांची एकच तक्रार असायची . ती म्हणजे ते जे कपडे वापरत होते ते सतत फाटायचे. आणि प्रामुख्याने त्यांचे खिसे जास्त फाटत असत. यावर उपाय म्हणून लेव्ही स्ट्रॉस याने आपल्याकडच्या चांगल्या जाड्याभरड्या कापडाच्या पॅन्ट बनवून विकायला सुरुवात केली. या पँट्स ना चांगला प्रतिसाद मिळाला.
लेव्ही स्ट्रॉस कडील ते जाड कापड लवकर संपलं. त्याने “सर्ज डेनाइम” या नावाचं एक वेगळं कापड मागवलं. याच कापडाला पुढे डेनिम या नावाने ओळखलं जाऊ लागलं.
याच दरम्यान डेविस नावाच्या एका टेलर ने कपड्यांमध्ये धातूंच्या रिवेट्स बसवण्याचे तंत्र विकसित केले. पॅन्ट मध्ये खीशांच्या शिवणीवर जेथे सर्वाधिक ताण येतो तिथे रिवेट्स आल्यामुळे खीसे फाटणे बंद झाले. डेविस कडे पुरेसा पैसा नसल्याने त्याने लेव्ही स्ट्रॉस बरोबर भागीदारी करून या रिवेटस बसवण्याचं पेटंट घेतलं.
आज आपण ज्या जीन्स वापरतो त्यामध्ये देखील असे धातूंचे रिवेज लावलेले पाहता येतात.
मित्रांनो, लेव्ही स्ट्रॉस हा आज जगातला जीन्स पॅन्ट चा मोठा ब्रँड आहे.
या यशोगाथे कडे नीट पाहिलं तर लक्षात येईल ती त्यांच्या बिजनेस यशामागे काही फार मोठा धोरणात्मक विचार नव्हता. जे त्यांनी साधलं तो काही चमत्कारही नव्हता. या त्यांच्या यशामागे होतं कॉमन सेन्स.
प्रश्न शोधून त्यावर सोपे उपाय ग्राहकाला लवकरात लवकर देणे एवढच. बऱ्याचदा आपण उगाचच एखाद्या इनोव्हेटिव्ह आयडिया शोधण्याच्या मागे लागतो, काहीतरी भन्नाट बिझनेस कल्पना मिळाली तर मी यशस्वी होईन असं आपल्याला वाटत राहतं. पण खरं तर ग्राहकांच्या सोप्या प्रश्नाचे उत्तर शोधून त्यांना दिलं, तर ते आणखी प्रश्न सांगतात, त्यावर आपण आणखीन उत्तर शोधायची, मग ते आणखी नवे प्रश्न विचारतील…. त्यांच्यासाठी उत्तर शोधताना कधीतरी आपल्याला भन्नाट आयडिया मिळालेली असेल. इनोव्हेशनची प्रोसेस ही अशी असते.
आजच आपल्या आसपासचे बदल लक्षपूर्वक बघा…. त्यामध्ये कोणते प्रश्न दडलेले आहेत ते शोधा…. आणि त्यावर काय सोपे उपाय आपल्याला करता येईल यावर विचार करा. कोरोना काळात कोणी वेगवेगळ्या स्टाईल चे मास्क बनवले, कोणी स्पर्श न करता सामानाची देवाणघेवाण करता यावी असे मशिनच बनवले, रिक्षामध्ये ग्राहक आणि चालकाच्या मध्ये बसणारा पडदा बनविला….. तर कोणी प्रेशर कुकर चा वापर करून वाफ घेता येण्यासाठी मशीन बनवलं….. ही सगळी उदाहरणं लोकल प्रॉब्लेम्सना शोधलेली लोकल सोल्युशन्स आहेत. यामधून मोठा बिझनेस कदाचित उभा राहणार नाही परंतु भविष्यात मोठ्या होणाऱ्या एखाद्या बिजनेस ची सुरुवात यांच्यापैकीच एक असू शकेल.
कॉमन सेन्स नावाप्रमाणे तितकसं कॉमन नसतं….. आणि खूप काही कठीणही नसतं..
(संकलन – श्याम धारासूरकर librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit the library blog for more articles)
मुलांचे स्वातंत्र्य
स्टेला एकटीच रहात होती. तिच्या छोट्याश्या घरात तिच्यासोबत तिचा एक लाडका कुत्रा पण होता. त्याचं नाव “बडी”. दोघांची चांगली गट्टी होती. पण तिच्या मनात अजून एका निराधार कुत्र्याला आपलंसं करण्याची ओढ होती. एक दिवस तिने एका कुत्र्यांच्या बचाव केंद्राला (Dog Rescue Center) भेट दिली. तिथे तिला एक निराधार कुत्रा दिसला. त्याच्या डोळ्यात भूतकाळातील वेदना आणि रस्त्यावरच्या संघर्षाची कहाणी दिसत होती. तिने त्याला घरी न्यायचं ठरवलं आणि त्याला ‘टायगर’ असं नाव दिलं.
स्टेलाच्या घरी बडी आणि टायगर एकमेकांचे मित्र झाले. दोघंही मिळून घरात खूप धमाल करायचे. स्टेला सकाळी कामावर जायची आणि संध्याकाळी परत येऊन त्यांच्यासोबत खेळायची.
असंच एक दिवस ती नेहमीप्रमाणे कामावर गेली.
पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. तिचा फोन वाजला. पलीकडून कोणीतरी अनोळखी व्यक्ती म्हणाली, “मॅडम, तुमचा कुत्रा आम्हाला रस्त्यावर सापडला आहे. त्याच्या गळ्यातील पट्ट्यावर तुमचा नंबर होता.” तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिचा कुत्रा रस्त्यावर कसा पोहोचला ? मी तर गेट बंद करूनच बाहेर पडली होती? याचा विचार करतच घाबरून ती लगेच त्या ठिकाणी धावली. तिथे तिला तिचा लाडका ‘बडी’ घाबरलेला आणि गोंधळलेला दिसला. तिला खूप आनंद झाला की तो सुरक्षित आहे. पण लगेच तिच्या मनात भीती निर्माण झाली. ‘टायगर’ कुठे आहे ?
तिने ‘टायगर’चा खूप शोध घेतला, त्याचे नाव घेऊन त्याला हाका मारल्या, पण तो कुठेच सापडला नाही. तिच्या मनात एक वाईट विचार आला. कदाचित रस्त्यावरचा अनुभव असलेला ‘टायगर’ पुन्हा त्याच्या जुन्या जीवनाकडे परत पळून गेला असावा. तिला वाटले की, त्याने तिला आणि तिने दिलेल्या प्रेमाला नाकारले. तिला खूप वाईट वाटले.
निराश होऊन ती ‘बडी’ला सोबत घेऊन घरी परतली. आणि जशी तिने गाडी घराच्या आवारात थांबवली, तिला दिसलं, तिचा ‘टायगर’ दरवाज्यासमोर बसला होता.
एका क्षणात तिला सर्व काही समजले. तिच्या शेजाऱ्यांपैकी कुणीतरी गेटचा दरवाजा उघडा ठेवला होता. तिचा लाडका ‘बडी’, ज्याला घराच्या सुरक्षिततेची सवय होती, त्याने बाहेरच्या जगात फिरण्याची संधी साधली आणि तो पळून गेला.
पण ‘टायगर’… ज्याने रस्त्यावरील कठीण आयुष्य अनुभवले होते, त्याला घराच्या सुरक्षिततेचे आणि प्रेमाचे खरे महत्त्व कळले होते. त्याने पळून जाण्याचा विचारही केला नाही. त्याला माहीत होतं की, घर म्हणजे प्रेम, सुरक्षा आणि निवारा. तो बाहेर न जाता तिथेच थांबला होता, कारण त्याला त्याची किंमत माहीत होती. ज्याला सुरक्षिततेचे आणि प्रेमाचे मूल्य माहीत आहे, तो कधीही ते गमावू इच्छित नाही.
हीच गोष्ट आपल्या मुलांसोबतही होऊ शकते
तात्पर्य –
1. मुलांना स्वातंत्र्य दिले नाही तर ते मिळविण्याचा प्रयत्न करतील.
2. जोपर्यंत बाहेरच्या दुनियेचा स्वतंत्र अनुभव घेत नाही तोपर्यंत त्यांना घराची किंमत समजत नाही.
3. चुका केल्या तरी त्यांना आपलंसं करेल असं घर उपलब्ध करून देणे पालकांची जबाबदारी आहे. जिथे मुलांना परत यावसं वाटेल.
आताचे पालक आणि भविष्यात होणारे पालक ( म्हणजे आपले विद्यार्थी ) यांनी नक्कीच बोध घ्यावा आणि मर्यादित स्वरूपात स्वातंत्र्य उपभोगावे..
” कौन सिखता हैं सिर्फ बातोंसे… सबको एक हदसा जरुरी हैं “
