कर्म आणि फळ- मनोरंजक उदाहरण

“तुम्ही काय करता हे महत्त्वाचे आहे, तुम्ही काय करण्याचा विचार करत आहात हे नाही.” –

— पाब्लो पिकासो

बऱ्याच वर्षांपूर्वी, ‘क्रू’ (Crew) नावाच्या टेक्नॉलॉजी कंपनीचे सह-संस्थापक मिकेल चो (Mikael Cho) यांची कंपनी जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर होती. त्यांच्याकडे फक्त काही महिन्यांपुरतेच पैसे शिल्लक होते आणि त्यांना कंपनी वाचवण्यासाठी काहीतरी करणे भाग होते.

त्यावेळी, त्यांची टीम ‘क्रू’ साठी एका नवीन वेबसाइटवर काम करत होती. वेबसाइटसाठी काही चांगले स्टॉक फोटो शोधताना त्यांना वापरण्यासारखे काहीच सापडले नाही. म्हणून त्यांनी एका कॉफी शॉपमध्ये काही झटपट फोटो काढण्यासाठी एका फोटोग्राफरला कामावर ठेवले. त्यांना फक्त एकाच फोटोची गरज होती आणि काही फोटो अतिरिक्त शिल्लक राहिले होते. म्हणून त्यांनी ते फोटो ऑनलाइन मोफत डाउनलोड करण्यासाठी शेअर करण्याचा निर्णय घेतला.
फक्त तीन तासांत एक साधी टम्बलर (Tumblr) थीम वापरून, त्यांनी ‘अनस्प्लॅश’ (Unsplash) नावाची एक वेबसाइट तयार केली आणि त्यावर त्या अतिरिक्त फोटोंच्या डाउनलोड लिंक्स टाकल्या.

त्यानंतर टीम आपल्या कामाला लागली, कारण त्यांना आपली मूळ कंपनी वाचवायची होती.
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पुढे काय झाले असेल याची कल्पना असेलच. ‘अनस्प्लॅश’ने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. पहिल्याच वर्षात लाखो लोकांनी या वेबसाइटला भेट दिली आणि फोटो डाउनलोड केले. अधिकाधिक लोकांना त्यांचे अतिरिक्त फोटो शेअर करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी ते ‘अनस्प्लॅश’च्या माध्यमातून शेअर केले. अखेरीस, ‘अनस्प्लॅश’ हे ‘क्रू’ कंपनीसाठी प्रसिद्धीचे सर्वात मोठे माध्यम ठरले, ज्यामुळे ‘क्रू’ कंपनी केवळ टिकलीच नाही, तर तिला आवश्यक प्रसिद्धीही मिळाली. काही वर्षांनंतर, लोकांनी ‘अनस्प्लॅश’वर कोट्यवधी फोटो अपलोड केले आहेत. आजही ही वेबसाइट जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या २००० वेबसाइट्सपैकी एक आहे.(पाच वर्षानंतर Unsplash ला न्याय देता यावा यासाठी Crew हा बिझनेस विकून पूर्ण फोकस Unsplash वर करण्यात आला !)

हे सर्व फक्त यासाठी घडले कारण ‘क्रू’च्या टीमने त्यांचे अतिरिक्त फोटो एका साध्या वेबसाइटवर शेअर करण्याचा निर्णय घेतला. त्या टीममधील कोणालाही त्यावेळी कल्पना नसेल की हा छोटासा साईड प्रोजेक्ट त्यांची कंपनी वाचवेल आणि एका पूर्णपणे नवीन कंपनीला जन्म देईल.
शेवटी, गोष्ट फक्त कृती करण्याची आहे. ‘पब्लिश’ बटण दाबण्याची आहे. परिपूर्णतेचा विचार न करण्याची आहे. आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवण्याची आहे.
गोष्ट आहे एखादी कल्पना सुचल्यावर त्यावर लगेच काम करण्याची. काहीतरी तयार करून ते जगासमोर मांडण्याची. एखाद्या दिवशी कदाचित फक्त एकच व्यक्ती तुमच्या कामाचे कौतुक करेल (ते ही ठीकच आहे !), तर दुसऱ्या दिवशी हजारो लोकही करू शकतात. दोन्ही परिस्थितीत ते मोलाचेच आहे.
‘केसी नेस्टॅट’ (Casey Neistat) हे नाव तुमच्यापैकी काहींना कदाचित परिचित असेल. तो एक जगप्रसिद्ध YouTuber आणि व्लॉगर आहे. पण त्याच्या व्लॉगिंग कारकिर्दीच्या अनेक वर्षांपूर्वी, त्याने “क्रेझी जर्मन वॉटर पार्क” नावाचा ३ मिनिटांचा एक व्हिडिओ अपलोड केला होता.
पुढील काही महिन्यांत, या व्हिडिओला केवळ YouTube वर १ कोटी ८० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो त्याचा (त्यावेळचा) सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ ठरला. या व्हिडिओमध्ये तसे काही खास नाही. तो एक चांगला व्हिडिओ आहे, पण तो त्याच्या सर्वोत्तम विडिओपैकी एक नक्कीच नाही. केसी स्वतःही सांगू शकणार नाही की त्याचा तोच व्हिडिओ इतरांच्या तुलनेत इतका व्हायरल का झाला. या व्हिडिओने केसीचे आयुष्य बदलले. या व्हिडिओमुळे त्याच्या चॅनलला आणि इतर व्हिडिओंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

मला खात्री आहे की हा व्हिडिओ इतका यशस्वी होईल याची केसीला स्वतःलाही कल्पना नसेल. कधीकधी आपल्याला आतून जाणीव होते की काहीतरी यशस्वी होणार आहे. पण बहुतेक वेळा, यश अगदी अनपेक्षित कारणांमुळे मिळते. आपल्याला फक्त “क्रेझी जर्मन वॉटर पार्क” सारखा एखादा व्हिडिओ ‘पब्लिश’ करायचा असतो.

तुम्ही लिहिलेला आणि प्रकाशित केलेला एक लेख तुमचे आयुष्य बदलू शकतो. तुम्ही अपलोड केलेला एक व्हिडिओ तुमचे करिअर घडवू शकतो. तुम्ही तयार केलेला एक छोटासा साईड प्रोजेक्ट तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतो.
पण अडचण ही आहे की, आपण या गोष्टी करतच नाही. आपण फक्त नियोजन करत बसतो, रणनीती आखतो, प्रमाणापेक्षा जास्त विचार करतो आणि काम न करण्यासाठी कारणे शोधतो.
अशा अनेक कथा आहेत. यावर विचार केल्यावर भविष्यात आणखी काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते. तुम्हालाही मिळेल या विचाराने हा लेख शेअर करत आहे. पुढे चालत राहा, धावत राहा आणि कामाचा आनंद घ्या.

कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका ! फळ अनपेक्षितरित्या , अनपेक्षित वेळी, अनपेक्षित मार्गाने मिळेलच !!

(संकलन -श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )

आपण खरच कीती बिझी आहोत !

जानेवारी महीन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येउन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या. सकाळ असल्याने कामावर जाणार्‍या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती.

काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले. आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले.

त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली. एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली. आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता.

मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तो तेथेच उभा राहुन अगदी मनापासुन त्या वादकाकडे आणि वादनाकडे लक्षपुर्वक पाहु लागला. तो मुलगा त्याच्या आईबरोबर होता आणि त्याची आई त्याला पुढे जाण्यासाठी ओढतच नेत होती. तेथुन जाणार्‍या प्रत्येक मुलासोबत असेच होत होते. प्रत्येक मुल ते गाणे ऐकायला थांबु पाहत होते आणि प्रत्येक पालक त्यांना ओढुन नेत होते.

४५ मिनिटांच्या वादनात फक्त ६ जणांना ते गाणे ऐकण्यासाठी क्षणभर का होईना थांबावेसे वाटले. जवळपास २० लोकांनी त्या वादकाला पैसे दीले मात्र तेही न थांबता तेथुन निघुन गेले. त्या वादकाने ३२ डॉलर्सची कमाई केली. पण जेव्हा त्याने वादन थांबवले तेव्हा संगीत बंद झाल्याचे कोणाच्या लक्षात देखील आले नाही. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत की त्याला शाबासकी दीली नाही.

कोणालाही हे कळले नाही की तो वादक दुसरा तीसरा कोणीही नसुन जगातील सर्वोत्कॄष्ट व्हायोलीन वादक जोशुआ बेल हा होता. आणि त्याने वाजवलेली तान हे सुमारे ३.५ दशलक्ष डॉलर्स इतक्या कीमतीचे व्हायोलीनवर बनलेले जगातील सर्वोत्कॄष्ट संगीत होते.

स्टेशनवर व्हायोलीन वाजवण्याच्या दोनच दिवस आधी बॉस्टनमधील एका सभागॄहात झालेल्या त्याच्या कार्यक्रमाची तीकीटे अगदी १०० डॉलर प्रतीव्यक्ती इतक्या जास्त किमतीला गेली होती.

ही एक सत्य घटना आहे. खरेतर विविध गोष्टींचा आस्वाद घेण्याच्या लोकांच्या पद्धतीवर आणि प्राधान्यांवर प्रकाश टाकण्यासाठी केलेला हा एक प्रयोग होता. या प्रायोगाचा मुख्य हेतु खालील काही प्रश्नांचा उलगडा करणे हा होता.
– एखाद्या सार्वजनीक ठीकाणी आणि अयोग्य वेळी आपण सौंदर्याचा, कलेचा आस्वाद घेतो का?
– तो घेण्यासाठी आपण थांबतो का?
– अगदी वेगळ्याच मार्गाने नकळत समोर आलेल्या कलाकौशल्याला आपण तीतक्याच रसीकतेने वाखाणतो का?

या प्रयोगाचा एक निश्कर्ष असा देखील काढता येइल की – जर जगातील सर्वोत्कृष्ट वादकाचे सर्वोत्कृष्ट संगीत ऐकण्यासाठी एक क्षण थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो , तर मग विचार करा दररोज अशा कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आहे? बघा विचार करा आणि आपली उत्तरे आपणच शोधण्याचा प्रयत्न करा.

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )

Rear view mirror

आम्ही एकदा खोपोलीहून मुंबईकडे गाडी चालवत येत होतो. एक्स्प्रेस हायवेवर जायला ५ मिनिटेच शिल्लक होती. तेव्हा एका अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या गाडीचा आमच्या कारच्या साईड व्ह्यू मिररला हलकासा धक्का लागला. धक्याने आरशाची काच खाली पडली. आम्ही थोडं पुढे जाऊन गाडी थांबवली आणि रस्त्यात पडलेली ती काच उचलायला जाणार तोच समोरून आलेल्या दुसऱ्या एका गाडीखाली ती काच चिरडली गेली.
संध्याकाळची वेळ होती. आतल्या रिअर व्ह्यू मिररच्या मदतीने एक्स्प्रेस हायवेवर गाडी चालवायची होती. शेवटच्या लेन मध्ये राहून हळूहळू गाडी चालवत कसेबसे मुंबई पर्यंत पोचलो . तेव्हा लक्षात आलं की सुरक्षित गाडी चालवण्यासाठी ही छोटीशी आरशाची काच किती महत्वाची आहे.

गाडीसाठी रिअर व्ह्यू मिरर ज्याने शोधला त्याचे तर आभारच मानले पाहिजेत कारण त्याच्यामुळे कितीतरी अपघात टाळले गेले असतील. पण मित्रांनो, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कदाचित पण गाडीचा रिअर व्ह्यू मिरर सुरक्षिततेसाठी बनवला गेला नव्हता….तर तो बनवला गेला होता एक नियम मोडण्यासाठी !!

११४ वर्षानुर्वी १९११ साली रेसिंग कर ड्रायव्हर “रे हॉरोन (Ray Harroun) ” याने पहिल्यांदा गाडीत “रिअर व्ह्यू मिरर” वापरला. पण हा त्याचा खरा शोध नव्हता. तो ड्रायव्हर तर होताच , पण इंजिनिअरही होता. त्याला एका मोठ्या कार रेस मध्ये भाग घ्यायचा होता. त्यासाठी त्याने एक नवीन कारच डिझाईन केली होती. ही कार वेगळी होती कारण त्यात फक्त एकच सीट होती …फक्त ड्रायव्हर साठी !

रेस सुरु होण्याच्या दिवशी जेव्हा त्याने आपली कार आणली तेव्हा आयोजकांनी त्याला अडवलं. कारण त्यावेळी रेस कार मध्ये दोन माणसे बसत असत. एक ड्रायव्हर आणि एक मेकॅनिक. रेसच्या दरम्यान गाडी खराब झाली तर त्यासाठी मेकॅनिकची गरज होती आणि मॅकेनिकचे दुसरे काम होते मागे वळून येणाऱ्या गाड्यांची माहिती ड्रायव्हरला देणे. मॅकेनिक शिवाय गाडी चालवली तर इतर कार्सनाही अपघाताचा धोका होता. म्हणून आयोजकांनी रे हॉरोनला शर्यतीत भाग घेण्यास नकार दिला.

हॉरोनला खात्री होती की त्याची गाडी खराब होणार नाही. त्यामुळे मेकेनिकची गरज नव्हती पण आयोजकांच्या प्रश्नांवर त्याच्याकडे दुसरे उत्तर होते. त्याने चार धातूच्या पायांवर उभा असलेला एक आरसा काढला आणि स्टिअरिंग व्हॅलीच्या मागे लावला. आता तो मागे न वळता इतर गाड्यांकडे पाहू शकत होता.

असा प्रकार लोक पहिल्यांदाच बघत होते. पण आता आयोजकांना शंका घेण्यात वाव नव्हता म्हणून त्याला रेस मध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळाली. तशी ७५ मैल वेगाने “रे हॉरोन”ने शर्यत पूर्ण केली. आणि दोन मैलाच्या अंतराने तो ही शर्यत जिंकला देखील. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात “मागे न वळता बघता येणाऱ्या” उपकरणाची चर्चा होती. (त्यावेळी “रिअर व्ह्यू मिरर” असे नामकरण झाले नव्हते !)

त्यानंतर खूप वर्षांनी “रे हॉरोनने एक गुपित सांगितले की रेसचा रस्ता खराब असल्याने त्याने लावलेला आरसा इतका हलत होता की त्याला काहीही बघताच आले नाही. पण रेस मधून बाहेर काढले जाऊ नये म्हणून तो तसाच कुणालाही न सांगता गाडी चालवतच राहिला. आरशाचा खरा उपयोग मागे वळून बघण्यासाठी नव्हताच . ..मेकॅनिक शिवाय रेस मध्ये भाग घेता यावा हाच आरशाचा उद्देश होता.

“रे हॉरोन” रेस का जिंकला माहितीये ? कारण त्याच्या गाडीत मेकॅनिक नसल्याने गाडीचे वजन आपोआप कमी झाले. त्यामुळे चाकांची झीज कमी झाली. इतरांना जिथे ८ -१ ० वेळा चाकं बदलावी लागली तिथे होरोनला केवळ चार वेळाच चाके बदलावी लागली. म्हणून तो शर्यत जिंकला.

आज कोणतीही गाडी “रिअर व्ह्यू मिरर” शिवाय पूर्णच होत नाही. आणि आज सर्व रेसिंग कार मध्ये फक्त एकच माणूस (ड्रायव्हर) बसेल इतकीच जागा असते !

स्टीव्ह जॉब्ज म्हणतो तसं “प्रस्थापित नियम मोडणारेच जग बदलवणारं काम करतात !”

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian, उरण महाविद्यालय, उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322

जादूची उबदार पेटी

१०० वर्षांपूर्वीची वैद्यकीय परिस्थिती. तेव्हा वेळेआधी जन्मलेली चारपैकी तीन बाळं जिवंत राहत नव्हती.
हे तिसऱ्या जगात घडत नव्हतं— तर हे युरोप आणि अमेरिकेसारख्या तेव्हाही प्रगत मानल्या जाणाऱ्या देशांत घडत होतं.
डॉक्टर आणि नर्सेस अशा नाजूक अशक्त बाळांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या हातात जास्त काही नव्हतं.
ही बाळं पूर्ण विकसित नसत, अतिशय लहान आणि कुपोषित असत.
ती स्वतःला उब देण्यासाठी पुरेशी उष्णताही निर्माण करू शकत नसत, त्यामुळे ७५% बाळं मरत.
त्यावेळी वैद्यकीय क्षेत्राने हे नैसर्गिक आहे असे मान्य केले होते.

पण L’Hôpital Paris Maternité येथील डॉ. एतिएन टार्नियर हे अपवाद होते.
त्यांनी एकदा शेतामध्ये कोंबडीला तिच्या अंड्याना उब देताना पहिले. त्यांना वाटले हाच उपाय माणसांच्या बाळांसाठी वापरला तर ?
आणि १८८० मध्ये त्यांनी आणि त्यांचे सहकारी , डॉ.पियरे बुडिन यांनी हेच बाळांवर वापरण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी अशा पेट्या तयार केल्या ज्या उष्णता टिकवून ठेवतील, वर काचेचे झाकण लावले जे प्रकाशकिरण बाळांपर्यंत पोहोचवेल आणि बाळाच्या शरीराला उब देण्यासाठी त्या पेटीत गरम पाण्याची बाटली ठेवली.
हीच सुरुवात होती उपकरणाची ज्याला आपण इन्क्युबेटर म्हणून ओळखतो.

हा प्रयोग यशस्वी ठरत होता. त्यांनी इन्क्युबेटर मध्ये ठेवलेल्या बाळांचा जिवंत राहण्याचा दर खूप जास्त होता. आता हे इन्क्युबेटर सर्वच रुग्णालयात बसवणे आवश्यक होते.
पण वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा महागड्या आणि मूर्खपणाच्या उपकरणांमध्ये रस वाटला नाही.
याचं कारण—वेळेआधी जन्मलेली बाळं मरतात हा नैसर्गिक नियम आहे असे ते मानत होते. कोंबडीच्या अंड्यांचा आणि माणसांच्या बाळांचा काय संबंध असा प्रश्न देखील विचारला.

बराच प्रयत्न करूनही हॉस्पिटल्स मध्ये हे उपकरण लावता येत नव्हते. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक, डॉ. मार्टिन कौनी यांना एक वेगळीच कल्पना सुचली. त्यांनी वैद्यकीय संस्थांकडे न जाता थेट जनतेकडे जाण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी सहा इन्क्युबेटर्स घेतले आणि चक्क १८९६ च्या बर्लिन वर्ल्ड एक्झिबिशन या प्रदर्शनात मांडले. तिथे त्यांनी बर्लिन चॅरिटी हॉस्पिटलकडून वेळेआधी जन्मलेली सहा बाळे मिळविली. हॉस्पिटलने ती दिली, कारण त्यांच्यामते ती तशीही मरणारच होती.
त्यांनी नर्सेस नेमल्या आणि इन्क्युबेटरमधील बाळं जनतेसाठी प्रदर्शनात ठेवली. त्या बाळांना पाहण्यासाठी चक्क तिकीट लावले.

लोकांनी सामान्य बाळांपेक्षा चार पटीने लहान जिवंत बाळं पाहिली.
आणि तत्कालीन वैद्यकीय समजुतींच्या विरुद्ध, सर्व सहा बाळं निरोगी वाढताना दिसली.
त्यांनी हे इन्क्युबेटर्स अमेरिकेतही नेले, तिथेही तितकीच अकाली बाळं मरत होती.
१९०१ मध्ये त्यांनी हेच बफेलो, न्यूयॉर्क येथील पॅन अमेरिकन एक्झिबिशनमध्ये केले.
१९०२ मध्ये पुन्हा वर्ल्ड्स फेअरमध्ये केले.

आश्चर्याची बाब म्हणजे लोक जगातील सर्वात लहान आणि उबदार गुंडाळलेल्या बाळांना पाहायला २५ सेंट देत होते. आणि गरीब कुटुंबे आपली बाळं वाचण्यासाठी ही संधी मिळाल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानत होती. ज्यांचा मृत्यू अटळ वाटत होता अशा मुलांना जीवनदान देणारी ही उबदार पेटी एका जादूपेक्षा कमी नव्हती.
कौनी यांचे इन्क्युबेटर प्रदर्शन कोनी आयलंडमध्ये पुढील ४० वर्षे चालू राहिले.
या काळात त्यांनी ८,००० पैकी ६,५०० अकाली बाळांचे प्राण वाचवले.
म्हणजे जिवंत राहण्याचा दर २५% वरून थेट ८५% झाला.
शेवटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मान्य केले की हे उपकरण खरच मुलांना जीवनदान देणारे आहे.
आणि आज इन्क्युबेटर्स संपूर्ण जगभर रुग्णालयांमध्ये जीव वाचवत आहेत.

हे सगळं त्या डॉक्टरांनी पारंपरिक समजुतींकडे लक्ष न देता केले म्हणून शक्य झाले.
त्यांनी निसर्गकडील प्रश्नाला निसर्गाकडूनच उत्तर मिळविलं.
त्यांनी नियम बदलण्यासाठी धोपट मार्ग स्वीकारला नाही.
त्यांनी अशा लोकांकडे आपले उपकरण नेले ज्यांना खरंच त्यांच्या प्रश्नांवर सोल्युशन पाहिजे होते.
त्यांनी ते केले जे करणे त्यांना महत्वाचं वाटत होतं !

जे लोक आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी “जे जे करावे लागेल ते ते सर्व करतात” तेच लोक अडचणींवर मात करतात. बाकी लोक निराश होतात…अडचणींवसमोर गुडघे टेकतात किंवा नशिबाला दोष देत बसतात !!

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian उरण महाविद्यालय, उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )

लिफ्ट आणि आरसा

एका कंपनीमध्ये तेथील कर्मचारी लिफ्ट खूप हळू चालत असल्याची तक्रार करत होते. मजल्यांवरून ये-जा करण्यासाठी खूप वेळ लागत होता, ज्यामुळे लोकांचा कामातील वेळ वाया जात होता आणि त्यांची चिडचिड होत होती. लोक लिफ्ट लवकर चालेल या आशेने बटणे वारंवार दाबत असत.

(मोबाईल फोन येण्याच्या आधीची गोष्ट!)
कंपनी व्यवस्थापनाने या समस्येवर तोडगा काढायचे ठरवले. त्यांनी लिफ्ट बनवणाऱ्या कंपनीला बोलावून त्यांचा सल्ला मागितला. तज्ञांनी लिफ्टचे सर्वेक्षण केले आणि एक अत्यंत महागडा उपाय सुचवला. त्यांनी सांगितले की, “आम्ही अधिक मजबूत केबल्स, एक अधिक शक्तिशाली मोटर आणि अत्याधुनिक प्रणाली बसवून ही समस्या कायमची सोडवू शकतो.” हा उपाय लिफ्टला अधिक वेगवान बनवणार होता.

व्यवस्थापन या महागड्या उपायावर विचार करत असतानाच, एका कनिष्ठ अधिकाऱ्याने एक साधा पण वेगळा प्रश्न विचारला: “कर्मचाऱ्यांचा जेवणाच्या वेळी किंवा कॉफी पिताना कितीतरी जास्त वेळ वाया जातो मात्र तेव्हा कोणी तक्रार करत नाही. मग लिफ्ट मध्ये वेळ जातो त्याचीच एवढी तक्रार का होत असेल बरे?”
त्याच्या लक्षात आले की इतर वेळी कर्मचारी खात असतात किंवा बोलत असतात… म्हणजे गुंतलेले (engaged)असतात. मात्र लिफ्टमध्ये ते engaged नसतात, त्यामुळे वेळ गेलेला जाणवतो.
त्याला एक उपाय सुचला – जर आपण लिफ्टमध्ये जमिनीपासून छतापर्यंत मोठे आरसे लावले तर काय होईल? जेणेकरून मजल्यांवरून वर-खाली जाताना कर्मचारी स्वतःला पाहू शकतील — आपले रूप न्याहाळू शकतील, केस किंवा कपडे व्यवस्थित करू शकतील?”
हा उपाय अत्यंत कमी खर्चाचा होता, पण त्यामुळे मूळ समस्या सुटेल का? लिफ्टचा वेग तर तेवढाच राहणार होता. आश्चर्य म्हणजे, या उपायाने केवळ समस्येचे निराकरण झाले नाही, तर तक्रारी पूर्णपणे थांबल्या.
एकदा लिफ्टमध्ये आरसे लावले गेल्यानंतर कोणीही तक्रार केली नाही. लिफ्टचा वेग पूर्वीइतकाच होता, पण लोकांचा अनुभव पूर्णपणे बदलला होता. आता लिफ्टमध्ये शिरल्यावर लोकांचे लक्ष ‘किती वेळ लागतोय’ या विचारावरून हटून स्वतःच्या प्रतिमेवर केंद्रित झाले. लोक स्वतःला आरशात पाहू लागले, आपले कपडे, केस व्यवस्थित करू लागले. त्यांना त्यांच्या अधीरतेवर आणि कंटाळ्यावर मात करण्यासाठी काहीतरी करण्यासारखे मिळाले. त्यांचे मन दुसऱ्या गोष्टीत गुंतल्यामुळे वेळेचा विचार मागे पडला. समस्या लिफ्टच्या वेगात नव्हतीच, तर लोकांच्या मानसिक अवस्थेत होती.
समस्या ‘वेळेची’ नव्हती, तर ‘वेळेच्या जाणिवेची’ होती.
कंपनीने लक्षणांवर (symptoms) उपचार करण्याऐवजी मूळ कारणावर (root cause) काम केले. आपणही आपल्या जीवनातील समस्यांचे विश्लेषण करताना हेच करायला हवे. जर तुम्हाला कामाचा ताण जाणवत असेल, तर खरी समस्या जास्त काम आहे की तुमचे वेळेचे नियोजन (Time Management) चुकतेय? जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल, तर समस्या त्या व्यक्तीच्या वागण्यात आहे की तुमच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षांमध्ये? जेव्हा आपण खऱ्या समस्येच्या मुळाशी जातो, तेव्हाच आपल्याला आरशासारखा साधा पण प्रभावी उपाय सापडतो.

आपल्या आयुष्यातही अनेक “हळू चालणाऱ्या लिफ्ट्स” असतात. जसे की, करिअरमध्ये अपेक्षित प्रगती न मिळणे, नातेसंबंधात सुधारणा होण्यासाठी वेळ लागणे, किंवा एखादे ध्येय साध्य होण्यास विलंब लागणे. या परिस्थितीत आपण अनेकदा बाह्य परिस्थितीला दोष देतो. “माझा बॉस चांगला नाही,” “नशीब साथ देत नाही,” “परिस्थितीच बिकट आहे” अशा तक्रारी करतो. पण या लिफ्टच्या गोष्टीप्रमाणे, खरी समस्या अनेकदा बाह्य जगात नसते, तर आपल्या दृष्टिकोनात असते. आपण समस्येकडे कसे पाहतो (Power Of Perspective) यावर सर्वकाही अवलंबून असते. जर आपण आपला दृष्टिकोन बदलला, आपले लक्ष निराशेच्या भावनेवरून हटवून काहीतरी सकारात्मक किंवा विधायक गोष्टीवर केंद्रित केले, तर तोच ‘वेळ’ कमी त्रासदायक वाटू लागतो.

म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की आयुष्याची लिफ्ट खूप हळू चालली आहे, तेव्हा तक्रार करण्याऐवजी किंवा अधीर होण्याऐवजी, क्षणभर थांबा आणि स्वतःच्या आत डोकावून पाहा. कदाचित तुम्हाला फक्त एका ‘वैचारिक आरशाची’ गरज असेल, जो तुम्हाला दाखवून देईल की खरी शक्ती परिस्थिती बदलण्यात नाही, तर दृष्टिकोन बदलण्यात आहे…

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय
उरण – रायगड)
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )