साबण आणि हॉटेल

हॉटेल रूम मध्ये चेक इन केल्यानंतर, बॅग्ज ठेवून आपण सहसा पहिल्यांदा वॉशरूम कडे वळतो. बाथरूम काउंटर पाशी ठेवलेला आकर्षक पॅकिंग मधला साबण वापरतो. प्रत्येक हॉटेल अतिशय चोखंदळपणे साबण, शॅम्पू, त्यांचे पॅकिंग, त्यावरील ब्रॅण्डिंग याकडे लक्ष देऊन निवडत असते. पण हे छोटे आकर्षक साबण पुढे जाऊन त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरते. १-२ दिवस वापरून ग्राहक साबण तसाच ठेवतात (काही ग्राहक घरी नेतातही !) आणि त्या उरलेल्या साबणाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हॉटेल्स कडे येऊन पडते. तुम्ही म्हणाल एका छोट्याश्या साबणाला इतकं काय महत्व द्यायचं ? पण मित्रांनो तसं नाहीये !

हा खरंतर जगभरात एक मोठा प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ भारतातच बघा. भारतात साधारण ५०००० हॉटेल्स असतील असं गृहीत धरूया (प्रत्यक्षात जास्तच असतील) , प्रत्येक हॉटेल मध्ये सरासरी १० रूम्स धरल्या तर एकूण ५ लाख रूम्स आहेत. ७०% occupancy rate ने साधारण ३.५ लाख रूम्स दररोज वापरल्या जातात म्हणजेच दररोज ३.५ लाख साबण थोडेसे वापरून फेकून दिले जात आहेत. या साबणांचं काय करायचं ? असा प्रश्न खचितच हॉटेल मधील कुणा गेस्टला पडला असेल ! पण १४ वर्षांपूर्वी अमेरिकेत एका माणसाला हा प्रश्न पडला. नुसत्या प्रश्नावर तो थांबला नाही तर त्याचं उत्तरही त्याने शोधलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्या उत्तराने जगभरातील हजारो लोकांचे प्राण वाचवले ! त्याने साबणाला पुनर्जन्म दिला आणि अनेकांना मृत्यूपासून वाचवलं …

अमेरियकेतील शॉन सिपलर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करत होता. शॉन ला कामानिमित्त जगभर फिरावं लागत असे. इतकं की वर्षातील १५०-२०० दिवस तो हॉटेल्स मध्येच राहत असे. २००८ साली अशाच एका हॉटेल मध्ये शॉन थांबला होता तेव्हा त्याला अर्धवट वापरलेल्या साबणाचं पुढे काय होतं हा प्रश्न पडला. त्याने लागलीच रूम सर्विसला फोन केला आणि “वापरलेल्या साबणांचं तुम्ही काय करता ?” हा प्रश्न विचारला. उत्तर आलं, आम्ही वापरलेले साबण फेकून देतो. शॉन ने थोडी आकडेमोड केली आणि त्याला लक्षात आलं की लाखो साबण दररोज फेकले जात आहेत. यावर आपण काहीतरी करायला हवं. तो विचार त्याच्या डोक्यात घर करून बसला. काही आठवड्यानंतर तो जेव्हा घरी परतला तेव्हा जवळच असलेल्या Holiday Inn हॉटेल मध्ये जाऊन त्याने हाच प्रश्न विचारला. उत्तर ही तेच मिळालं. त्याने मॅनेजरला विचारलं टाकून देण्याऐवजी तुम्ही हे साबण मला द्याल का ? मॅनेजर ने होकार दिला. त्याच दिवशी त्याने सहा आणखी हॉटेल्सना भेट दिली आणि सगळ्या हॉटेल्सने होकारच दिला.

एका महिन्यातच शॉन हजारो असे साबण घेऊन आला आणि मित्रांच्या साहाय्याने आपल्या गॅरेज मध्येच एक छोटेखानी वर्कशॉप सुरु केले. त्याने बटाटे सोलावेत तसे साबणाचा बाहेरचा भाग सोलून काढला. त्यानंतर ग्राइंडर मध्ये टाकून साबणांचा चुरा केला. हा चुरा वितळवून नंतर साबणांच्या मोल्ड मध्ये टाकला. एक रात्री सुकविल्यानंतर दुसर्या दिवशी साबणाच्या वड्या कापल्या. आणि नवीन साबण तयार ! या सगळ्यासाठी त्याने किचन मध्ये वापरली जाणारे टूल्सच वापरले. या त्याच्या गॅरेजमधून लवकरच तो दररोज ५०० साबण तयार करू लागला. साबण तयार तर होऊ लागले पण त्यांचं करायचं काय ?

शॉनच्या वाचनात हे आले होते की जगभरात दररोज सुमारे ९००० बालके अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे मरण पावतात. यापैकी निम्याहून जास्त मृत्यू केवळ नियमित हात धुतल्याने टाळता येऊ शकतात. आपण तयार केलेले साबण अनेक गरीब देशांतील या बालकांपर्यंत पोहोचविण्याचा शॉनचा प्रयत्न होता. यासाठीच त्याने Clean The World नावाची संस्था सुरु केली.
कल्पना उद्दात्त असली तरी प्रत्यक्षात उतरवणे कठीण होते. हजारो हॉटेल्स मधून साबण गोळा करून, प्रोसेस करून , दूरवरच्या अनेक देशांत पोहोचविणे logistics च्या दृष्टीने कठीण होते आणि यासाठी पैसा उभारावा लागणार होता. देणगी देणाऱ्या अनेक संस्थांकडे त्याने प्रयत्न केले पण पैसे उभे करणे जमत नव्हते. इकडे साबणाचा साठा पण वाढत होता. लवकरच काही केले नसते तर शॉनला हा पूर्ण प्रकल्पच बंद करावा लागणार अशी चिन्हे दिसत होती.

तेव्हाच शॉन सिपलर ने एक नवीन बिझनेस मॉडेल वापरायचे ठरवले. (आपल्या कडील उद्योजकांना यातून प्रेरणा मिळावी हा या लेखाचा मूळ उद्देश आहे !) त्याने स्वतःच्या संस्थेला एक प्लॅटफॉर्म बिझनेस बनविले. जसा उबर हा ग्राहक आणि टॅक्सीचालक याना जोडणारा एक प्लॅटफॉर्म आहे तसा clean the world हा हॉटेल्स आणि गरजू बालके याना जोडणारा प्लॅटफॉर्म आहे. यात दोन्ही बाजूना फायदा व्हावा अशी योजना असते. शॉनने clean the world मध्ये सहभागी होणाऱ्या हॉटेल्सना प्रत्येक रूममागे १ डॉलर प्रति महिना अशी नाममात्र फी आकारायला सुरुवात केली. या फी मध्ये हॉटेल्सना तीन फायदे झाले. पहिला म्हणजे साबणाची विल्हेवाट लावण्याच्या जबाबदारीतून मुक्ती , दुसरा म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने Sustainability Goals पूर्ण करण्यासाठी मदत आणि तिसरा म्हणजे हॉटेलचा सोशल इम्पॅक्ट दाखविण्याची सोय !

त्याचसोबत United Nations, Unicef, children International या संस्थांसोबत काम करून साबणाची आवश्यकता जिथे आहे , तिथे ते पाठविण्याची सोय केली. लोकल क्लिनिक्स आणि शाळांसोबत या संस्था काम करतात. लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व शिकवतात, साबण वाटप आणि वापराची देखरेखही करतात. सध्या Clean the world ८००० हॉटेल्स (१.५ मिलियन रूम्स) सोबत काम करत आहेत, जगभरात ८ पेक्षा जास्त देशांत साबण प्रोसेस करण्याचे कारखाने त्यांनी सुरु केले आहेत. १२७ देशांत सात करोड साबण आतापर्यंत त्यांनी पोहोचवले आहेत आणि हे करत असताना समुद्रात/जमिनीत जाणारा २३ मिलियन पाउंड कचरा कमी केला आहे. सीरिया मधील रेफ्युजी, सोमालिया, बांगलादेश, पाकिस्तान, झाम्बिया, होन्डुरास हे आफ्रिकन देश सगळ्यात मोठे लाभार्थी ठरले आहेत.

अजूनही जगातील ३ बिलियन लोकांकडे साबणासारखी साधी पण जीवनावश्यक सुविधा पोहोचलेली नाही. आणि अजूनही हजारो हॉटेल्स साबण फेकून देत आहेत. clean the world पासून प्रेरणा घेऊन इतर देशांमध्येही असं काम करणाऱ्या संस्था उभ्या राहू लागल्या आहेत. शॉनने एकापेक्षा अधिक प्रॉब्लेम्स आपल्या युनिक आयडीयाने सोडवले आहेतच, तेही कुणाच्या देणगीवर अवलंबून न राहता एक प्रोफीटेबल बिझनेस उभारून ! आजही शॉन सगळ्यांना हेच सांगतो …तुमच्या बेसिनवर पडून असलेला तो साबणाचा तुकडा कुणाचातरी जीव वाचवू शकतो…तो वाया घालवू नका !

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )

Act of Kindness

एका मुलाखतीत गुंतवणूकदार रिक बर्हमन यांना एक प्रश्न विचारण्यात आला – “तुमच्यासाठी कोणी केलेली सगळ्यात दयाळू (Act of Kindness) गोष्ट कोणती?”

रिक यांनी थोडा वेळ घेऊन उत्तर दिले –
“आमचा मुलगा थियो, जन्मल्यानंतर पहिले सहा महिने NICU (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये होता. अनेक रुग्णालयं, शेकडो इंजेक्शन्स, सतत धावपळ आणि धाकधूक. त्या काळात काही बाळं आमच्या डोळ्यांसमोरच गेली. आणि त्यापैकी काही तर थियो पेक्षा कमीच आजारी होती.
मला आजही नक्की माहित नाही की तो कसा वाचला. पण एक गोष्ट मला नक्की माहित आहे — शेकडो डॉक्टर्स, नर्सेस, थेरपिस्ट्स, तज्ज्ञ यांनी त्यांच्या क्षेत्रातील कौशल्यावर वर्षानुवर्षे मेहनत घेतली होती. उपचारांसाठी लागणारी गुंतागुंतीची उपकरणं, कित्येक वर्षांच्या संशोधनातून तयार झालेली औषधं, त्यांचं ‘मास्टरिंग द क्राफ्ट’च त्याच्या जगण्यामागचं खरं कारण होतं.”

रिक म्हणाले –
“त्या क्षणी त्यांना तो ‘दयाळूपणा’ वाटला नसेल… पण ते केवळ त्यांचं काम नव्हतं , तो त्यांचा अमूल्य असा दयाळूपणाच होता !”

रिकच्या या कथेमुळे एक छोटा पण खोल अर्थ असलेला निबंध – “I, Pencil” आठवला. अर्थतज्ञ Leonard E. Read यांनी लिहिलेला हा निबंध म्हणजे एका सामान्य पेन्सिल ची आत्मकथा आहे — एक साधी पेन्सिल आपल्याला जगण्याचं सर्वात मोठं सत्य शिकवते.
पेन्सिल सांगते – “माझ्या निर्मितीमागे हजारो लोकांची मेहनत आहे. आणि त्यापैकी एकाही माणसाला संपूर्ण प्रक्रिया माहीत नाही.”

एका पेन्सिल मागची अद्भुत आंतरराष्ट्रीय साखळी..
अगदी एका साध्याशा पेन्सिल साठी सुद्धा जगभरातून कोट्यवधी हात लागतात.
उदाहरणार्थ, पेंसिलसाठी लागणारं लाकूड अमेरिकेच्या ओरेगॉन आणि कॅलिफोर्नियामधील सेडर झाडांपासून घेतलं जातं. त्यासाठी झाडं वाढवणारे आणि छाटणारे असंख्य हात राबले असतील. झाडं कंपन्यांच्या मशीन्स आणि लाकूड वाहून नेणारी वाहने बनवण्यासाठी कितीतरी हात राबले असतील.

त्यामध्ये वापरण्यात येणारा ग्राफाइट भारत आणि श्रीलंकेतील खाणींमधून येतो. काळोख्या खोल खाणीत जीव मुठीत घेऊन हजारो कामगार राबले असतील.
पेंसिलचा रबर अर्थात इरेझर हा थायलंड आणि मलेशिया या देशांतून आलेल्या नैसर्गिक रबरपासून बनतो. त्याला जोडलेली धातूची छोटी रिंग – फेरूल – ती ब्राझील आणि चीनमध्ये तयार होते. पेन्सिल ला आकर्षक रंग आणि कोटिंग देणारे रसायन जपानमधून येते. आणि हे सगळं एकत्र करून पॅक करून वितरित करणारं काम भारत, व्हिएतनाम आणि फिलिपिन्समधील मजूर व वाहतूक करणाऱ्यांकडून केलं जातं.
म्हणजे आपल्या हातातली एक पाच रुपयांची पेंसिल ही तब्बल सात-आठ देशांतील हजारो लोकांच्या हातून, नजरेत न आलेल्या श्रमातून, शांतपणे आणि एकत्रितपणे तयार झालेली गोष्ट असते.

रिक बर्हमनच्या डॉक्टरप्रमाणे, पेन्सिल बनवणारेही कधी समोर येत नाहीत. ते देखील हे करताना “दयाळूपणा” म्हणून करत नाहीत — पण ही पेन्सिल हातात घेऊन जेव्हा एखादं मूल वहीवर लिहायला शिकतं तेव्हा तो एक दयाळूपणाच असतो.
अशा असंख्य गोष्टी आपण दररोज सहज वापरत असतो – लेखणी, फोन, औषध,धान्य, पंखा, आणि इंटरनेट…

म्हणूनच हे लक्षात ठेवायला हवं – “आपण एकट्याने काही करू शकत नाही !”

जेव्हा आपण सोशल मीडियामध्ये दररोज कुणावर तरी बहिष्कार टाका असे सांगणाऱ्या पोस्ट्स वाचतो तेव्हा i pencil हा निबंध जरूर आठवतो. आज जेव्हा कुणी म्हणतो – हा देश बायकॉट करा, तो ब्रँड बायकॉट करा किंवा त्या धर्माच्या लोकांना बायकॉट करा. तेव्हा आपण एक गोष्ट विसरतो – “आपण एकट्याने काही करू शकत नाही !”
तुमचा मोबाईल – त्याचं स्क्रीन दक्षिण कोरियामधून, सर्किट तैवानमधून, बॉडी चीनमधून, सॉफ्टवेअर अमेरिका किंवा भारतातून येतं. हे “परावलंबन” नाही हे आहे “परस्परावलंबन” ! या पृथ्वीवर फक्त माणूसप्राण्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर “परस्परावलंबन” शक्य झालं आहे. हे आपल्या माणूसपणाचं वैशिष्ट्य सोडून द्यायचं ??

आज तुम्ही जेवण करत असाल, मोबाईल वापरत असाल, गाडी चालवत असाल – थांबा. आणि त्या गोष्टीमागचे ‘दिसत नसलेले’ हात आठवा.
कोणालातरी ‘धन्यवाद’ म्हणा – अगदी दरवाजावर पेपर ठेवणाऱ्यालाही.
पुढच्यावेळी ‘बायकॉट’चा विचार करताना, त्या निर्णयाचे परिणाम किती हातांवर होतील याचा अंदाज बांधा.

जर पाच रुपयांची पेन्सिल आपल्याला इतकं शिकवू शकते, तर आपण काय शिकणार नाही?
तुमच्या हातातलं बाळ असो, किंवा हातातली पेन्सिल – त्यामागे असलेल्या हजारो अदृश्य हातांसाठी मनापासून एकच शब्द म्हणा … 🙏 “Thank you.”

“वसुधैव कुटुंबकम !” हा केवळ सुविचार नाही…तर तो “सत्यविचार” आहे !

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय, उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )

स्टेन गुस्टाफ़ थुलिन

स्टेन गुस्टाफ़ थुलिन हा स्वीडन मधील एक संशोधक होता.
१९५९ मध्ये त्याने एक शोध लावला – प्लास्टिक बॅगचा !

कारण तेव्हा होणारा कागदी पिशव्यांचा भरमसाठ वापर. त्याकाळी सर्वत्र कागदी पिशव्याच वापरल्या जात. हा कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत होती. स्टेनला पर्यावरणाची काळजी होती. म्हणून त्याने कागदी पिशव्यांसाठी पर्याय शोधला. आणि त्यातून शोध लागला प्लॅस्टिक पिशव्यांचा.

प्लास्टिक पिशव्या सोयीस्कर होत्या. त्यामुळे त्यांची मागणी आपोआप वाढू लागली. त्यानंतर केवळ २ ० वर्षांत संपूर्ण युरोपात ८० % प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या जाऊ लागल्या.

हळूहळू हा शोध जगभर पसरला आणि आता प्लास्टिकच्या पिशव्यांचा भरमसाठ वापर होतो आहे. हे प्लॅस्टिक नष्ट व्हायला हजारो वर्षे लागतात, या प्लास्टिकचे समुद्राच्या तळांशी भव्य डोंगर उभे राहिले आहेत आणि लाखो समुद्री प्राणी प्लॅस्टिकमध्ये अडकून किंवा गुदमरून मरण पावतात.

जो शोध पर्यावरणाच्या बचावासाठी होता तोच शोध आता पर्यावरणाची प्रचंड हानी करत आहे.

गेल्या दशकात यावर उपाय म्हणून अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या बॅन त्याच्याएवजी करून कापडी पिशव्यांचा वापर सुरु करण्यात आला. आता वापरणाऱ्याला वाटते की मी कापडी पिशवी वापरून पर्यावरणाचे रक्षण करण्यास हातभार लावतोय.

पण २०१८ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार कापसाच्या पिशव्यांच्या उत्पादनामुळे मुख्यत्वे पाण्याची मोठी गरज आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते.
यामध्ये पाण्याच्या स्रोतांचा ऱ्हास होतो, मातीची गुणवत्ता खालावते आणि जलप्रदूषण तसेच हवामान बदलास कारणीभूत ठरणारे वायू उत्सर्जन होते. ओझोनचा थर नष्ट होण्यात देखील कापडी पिशव्यांच्या प्रॉडक्शनचा हात आहे.

जर खरंच कापडी पिशवीचा पर्यावरण रक्षणासाठी उपयोग व्हायचा असेल तर प्रत्येक पिशवीचा तब्बल 7100 वेळा पुनर्वापर होणे आवश्यक आहे.

यावर उपाय म्हणून लोक ऑरगॅनिक कॉटन पासून बनलेल्या पिशव्यांकडे वळले. पण प्रत्यक्षात ऑरगॅनिक कॉटन त्याहून जास्त हानिकारक ठरत आहे. ऑरगॅनिक कॉटनचे उत्पन्न कमी (कमी यील्ड) असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज दुपटीने जास्त असते.

आणि हे सगळे कमी म्हणून की काय या प्रश्नामध्ये आणखी गुंतागुंत वाढते ती माणसाच्या दुटप्पी स्वभावाची ! आम्ही पर्यावरणाची काळजी करतो म्हणून छान छान कापडी बॅग खरेदी करणारे, त्या अभिमानाने मिरवणारे लोक प्रत्यक्षात आपली बॅग खराब होऊ नये म्हणून दैनंदिन खरेदीच्या वेळी प्लास्टिक पिशव्यांच वापरतात. (ग्रीनवॉशिंग) म्हणजे प्लॅस्टिकही आणि कॉटनही …पर्यावरणाला दुहेरी धक्का !

तशीच गत गाड्यांच्या बाबतीत झाली आहे. सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या घोडागाड्यांमुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात घोड्यांची लीद पसरलेली असायची. त्यामुळे दुर्गंधी, आजार पसरणे असे प्रश्न उभे राहिले होते. पुढे तेलावर चालणाऱ्या इंजिनाच्या गाड्या आल्या आणि हा प्रश्न सुटला.
पण तेलावर चालणाऱ्या गाड्यांचा वापर वाढला आणि हवेतील प्रदूषण, जमिनीतील मर्यादित तेलसंपत्तीचा अमर्यादित उपसा असे नवे प्रश्न तयार झाले. यावर उपाय म्हणून आता इलेक्ट्रिक वाहनांकडे पहिले जाते आहे.

पर्यावरण प्रेमी इलेक्ट्रिक गाड्यांकडे झुकत आहेत कारण इलेक्ट्रिक गाडीतून निघणारा धूर दिसत नाही. पण प्रत्यक्षात बॅटरी साठी लागणारी खनिजे लिथियम/कोबाल्ट
शोधण्यासाठी कित्येक खाणी दिवसरात्र जमिनीच्या पोटात खोलवर शिरत आहेत. बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणारी वीज तयार करण्यासाठी कित्येक टन कोळसा जाळला जात आहे. हे मात्र आपल्याला दिसत नाही. कितीतरी गोष्टी नजरेआड होतात म्हणून त्या घडतच नाही असे वाटते.

हा प्रवास एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो: आपली चांगली ‘इच्छा’ (Intention) नेहमीच ‘उत्तम परिणामा’त (Result) रूपांतरित होतेच असे नाही.
जीवनात आपण अनेक निर्णय घेतो, अगदी पिशवी निवडण्यापासून ते करिअर निवडण्यापर्यंत. प्रत्येक वेळी आपली इच्छा काहीतरी चांगले करण्याची, परिस्थिती सुधारण्याची किंवा कोणतीही समस्या सोडवण्याची असते.स्टेन थुलिन यांना पर्यावरणाची काळजी होती; कापडी पिशवी वापरणाऱ्यांनाही तेच वाटते आणि इलेक्ट्रिक गाडी घेणाऱ्यांनाही!
पण, केवळ चांगली इच्छा बाळगणे पुरेसे नाही; त्या इच्छेच्या संपूर्ण आणि दूरगामी ‘परिणामांचे’ कठोर विश्लेषण करण्याची आणि त्यांची जबाबदारी देखील आपलीच आहे नाही का?

(संकलन – श्याम धारासुरकर Librarian, उरण महाविद्यालय उरण.)
लायब्ररी हेल्पलाईन नंबर- 9892798322
(Please visit library-blog for more articles)

मोनालिसा

सन १५०३ मध्ये, फ्लॉरेन्स (इटली) येथील एका कलाकाराला स्थानिक व्यापारी फ्रांचेस्को डेल जियाकोंडो यांनी एक काम दिले. त्यांना आपल्या पत्नीचे चित्र बनवायचे होते.

ते चित्र खूप मोठे नव्हते – साधारण A2 पेक्षा लहान आकाराचे. ते एक सर्वसाधारण चित्र होते. त्यात काही विशेष नव्हते.

पण पुढे तो कलाकार नावारूपाला आला आणि म्हणून सुमारे ३०० वर्षांनंतर, १७९७ मध्ये, ते चित्र पॅरिसमधील लूव्र (Louvre) संग्रहालयात इतर मोठ्या चित्रांच्या मधोमध एका भिंतीवर लावण्यात आले.

तेव्हाही ते एक साधारण चित्रच होते. येणारे लोक त्याकडे फारसे लक्ष देत नव्हते.
पण २१ ऑगस्ट १९११ काहीतरी वेगळं घडलं. त्या दिवशी व्हिन्सेंझो पेरुगिया नावाचा एक चोर लूव्रमध्ये आला आणि एका स्वच्छता कक्षात लपून बसला. संग्रहालय बंद झाल्यावर तो बाहेर आला आणि त्याने ते छोटे चित्र भिंतीवरून उतरवले. ते त्याच्या कोटाखाली व्यवस्थित बसले आणि तो शांतपणे ते घेऊन दुसऱ्या दिवशी इमारतीतून बाहेर पडला.

बराच वेळ कोणाला काहीही वेगळं वाटलं नाही. नंतर कुणालातरी आठवलं की त्या दोन मोठ्या चित्रांच्या मधल्या जागेत एक छोटे चित्र असायचे. ते आता तिथे नाही. त्यांना वाटले कदाचित साफसफाईसाठी किंवा चित्राची जागा बदलण्यासाठी ते तिथून काढले असेल.

अखेरीस जेव्हा त्यांना कळले की ते साफसफाईसाठी काढलेले नाही, तेव्हा त्यांना चोरी झाल्याची जाणीव झाली.

पण ही साधी चोरी नव्हती. चोराने बाकीच्या सगळ्या उत्कृष्ट कलाकृतींकडे दुर्लक्ष करून फक्त हे छोटे चित्र नेले होते. याचा अर्थ, भिंतीवर टांगलेल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याचे महत्व जास्त असले पाहिजे !

या घटनेची बातमी वर्तमानपत्रांमध्ये पसरली. सगळ्यांना उत्सुकता होती की हा कोणता असा ‘मास्टरपीस’ आहे, ज्याला इतके महत्त्व देऊन चोरी करण्यात आले आहे. त्या चित्राचे नावही कोणाला ठाऊक नव्हते. लूव्रने तपास केला आणि जाहीर केले की त्या चित्राचे नाव आहे – ‘मोना लिसा’ (The Mona Lisa).
आणि अचानक… सगळ्यांना ‘मोना लिसा’ बघायची ईच्छा झाली ! 🤯

जगातल्या इतर कोणत्याही चित्रापेक्षा चोरण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरलेले हे चित्र आपल्याला बघायलाच हवे! पण ते तिथे नव्हते! आणि तिथे त्या चित्राचे ‘नसणे’ हेच लोकांना ते बघण्याची ओढ अधिक लावत होते.

दोन वर्षांनंतर, तो चोर ते चित्र फ्लॉरेन्समधील एका गॅलरीला विकण्याचा प्रयत्न करत असताना पकडला गेला आणि अखेरीस ‘मोना लिसा’ लूव्रमध्ये परतले. ते चित्र परत आल्यानंतर “मोना लिसा” पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. अल्पावधीतच, ‘मोना लिसा’ जगातील सर्वात प्रसिद्ध चित्र बनले. त्याशिवाय लूव्र संग्रहालय अपूर्ण वाटू लागले.

आज, दरवर्षी सुमारे साठ लाख (६० लाख) लोक फक्त ‘मोना लिसा’ बघण्यासाठी तिथे जातात.

मित्रांनो, या संपूर्ण कथेत जो मानसशास्त्रीय नियम लागू होतो, त्याला ‘विरलता सिद्धान्त’ (Scarcity Heuristic) असे म्हणतात.

जेव्हा एखादी वस्तू, संधी किंवा व्यक्ती सहज उपलब्ध नसते किंवा ती मर्यादित आहे (scarce) असे आपल्याला कळते, तेव्हा आपल्याला त्याची किंमत अचानक खूप जास्त वाटू लागते आणि ती मिळवण्याची इच्छा तीव्र होते.

चोरीमुळे ‘मोना लिसा’ अचानक अनुपलब्ध झाले. त्यामुळे ते इतके मौल्यवान बनले की नंतर ते जगातील सर्वात प्रसिद्ध चित्र बनले.
आपणही उपलब्ध असलेल्या प्रत्येक गोष्टीला ‘होय’ म्हणू लागलो, तर आपली किंमत कमी होते. जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेला (time) ‘मर्यादित’ (scarce) मानून, फक्त महत्त्वाच्या कामांसाठी ‘होय’ म्हणता आणि अनावश्यक गोष्टींना ‘नाही’ म्हणता, तेव्हा तुमच्या सहभागाची किंमत वाढते. तुमचे लक्ष (focus) दुर्मिळ बनल्याने, ते अधिक मौल्यवान ठरते.

तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात खूप खोलवर ज्ञान मिळवता, तेव्हा तुम्ही ‘मर्यादित तज्ज्ञ’ (scarce expert) बनता. तुमचे कौशल्य इतरांना सहज उपलब्ध नसते, ज्यामुळे त्याची मागणी आणि किंमत वाढते.

म्हणूनच लक्षात ठेवा: तुमची खरी किंमत तुम्ही किती उपलब्ध आहात यावर नाही, तर तुम्ही किती खास (Rare) आहात आणि तुमच्याकडे किती मूल्यवान ज्ञान आहे यावर ठरते!

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )

कॉमन सेन्स !

अठराव्या शतकामध्ये कॅलिफोर्निया मध्ये गोल्ड रश होती. गोल्ड रश म्हणजे सोन्याच्या खाणी शोधून सोनं काढण्यासाठी पूर्ण अमेरिकेतील लाखो लोकांनी कॅलिफोर्निया आणि आसपासच्या भागांमध्ये गर्दी केली केली होती. साधारण 3,00,000 खाण कामगार तेव्हा वेगवेगळ्या भागातून आले होते.

लेव्ही स्ट्रॉस आणि त्याचा मेहुणा डेविड स्टर्न यांना लक्षात आले की एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या कामगारांना कपडे, ब्लांकेट्स, जॅकेट, बटन, कात्र्या इत्यादी वस्तू लागतील. त्यांनी अशा विविध प्रकारच्या उपयोगी वस्तू आसपासच्या दुकानांमध्ये जाऊन विकायला सुरुवात केली.

एवढेच नव्हे तर घोड्याच्या पाठीवर सर्व सामान लादून त्यांनी थेट कामगारांना गाठून विकायला पण सुरुवात केली. या खाण कामगारांशी बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की सर्व कामगारांची एकच तक्रार असायची . ती म्हणजे ते जे कपडे वापरत होते ते सतत फाटायचे. आणि प्रामुख्याने त्यांचे खिसे जास्त फाटत असत. यावर उपाय म्हणून लेव्ही स्ट्रॉस याने आपल्याकडच्या चांगल्या जाड्याभरड्या कापडाच्या पॅन्ट बनवून विकायला सुरुवात केली. या पँट्स ना चांगला प्रतिसाद मिळाला.

लेव्ही स्ट्रॉस कडील ते जाड कापड लवकर संपलं. त्याने “सर्ज डेनाइम” या नावाचं एक वेगळं कापड मागवलं. याच कापडाला पुढे डेनिम या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

याच दरम्यान डेविस नावाच्या एका टेलर ने कपड्यांमध्ये धातूंच्या रिवेट्स बसवण्याचे तंत्र विकसित केले. पॅन्ट मध्ये खीशांच्या शिवणीवर जेथे सर्वाधिक ताण येतो तिथे रिवेट्स आल्यामुळे खीसे फाटणे बंद झाले. डेविस कडे पुरेसा पैसा नसल्याने त्याने लेव्ही स्ट्रॉस बरोबर भागीदारी करून या रिवेटस बसवण्याचं पेटंट घेतलं.
आज आपण ज्या जीन्स वापरतो त्यामध्ये देखील असे धातूंचे रिवेज लावलेले पाहता येतात.

मित्रांनो, लेव्ही स्ट्रॉस हा आज जगातला जीन्स पॅन्ट चा मोठा ब्रँड आहे.

या यशोगाथे कडे नीट पाहिलं तर लक्षात येईल ती त्यांच्या बिजनेस यशामागे काही फार मोठा धोरणात्मक विचार नव्हता. जे त्यांनी साधलं तो काही चमत्कारही नव्हता. या त्यांच्या यशामागे होतं कॉमन सेन्स.

प्रश्न शोधून त्यावर सोपे उपाय ग्राहकाला लवकरात लवकर देणे एवढच. बऱ्याचदा आपण उगाचच एखाद्या इनोव्हेटिव्ह आयडिया शोधण्याच्या मागे लागतो, काहीतरी भन्नाट बिझनेस कल्पना मिळाली तर मी यशस्वी होईन असं आपल्याला वाटत राहतं. पण खरं तर ग्राहकांच्या सोप्या प्रश्नाचे उत्तर शोधून त्यांना दिलं, तर ते आणखी प्रश्न सांगतात, त्यावर आपण आणखीन उत्तर शोधायची, मग ते आणखी नवे प्रश्न विचारतील…. त्यांच्यासाठी उत्तर शोधताना कधीतरी आपल्याला भन्नाट आयडिया मिळालेली असेल. इनोव्हेशनची प्रोसेस ही अशी असते.

आजच आपल्या आसपासचे बदल लक्षपूर्वक बघा…. त्यामध्ये कोणते प्रश्न दडलेले आहेत ते शोधा…. आणि त्यावर काय सोपे उपाय आपल्याला करता येईल यावर विचार करा. कोरोना काळात कोणी वेगवेगळ्या स्टाईल चे मास्क बनवले, कोणी स्पर्श न करता सामानाची देवाणघेवाण करता यावी असे मशिनच बनवले, रिक्षामध्ये ग्राहक आणि चालकाच्या मध्ये बसणारा पडदा बनविला….. तर कोणी प्रेशर कुकर चा वापर करून वाफ घेता येण्यासाठी मशीन बनवलं….. ही सगळी उदाहरणं लोकल प्रॉब्लेम्सना शोधलेली लोकल सोल्युशन्स आहेत. यामधून मोठा बिझनेस कदाचित उभा राहणार नाही परंतु भविष्यात मोठ्या होणाऱ्या एखाद्या बिजनेस ची सुरुवात यांच्यापैकीच एक असू शकेल.

कॉमन सेन्स नावाप्रमाणे तितकसं कॉमन नसतं….. आणि खूप काही कठीणही नसतं..

(संकलन – श्याम धारासूरकर librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322

(Please visit the library blog for more articles)