शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

१९८६ साली लिबिया आणि चाड या दोन देशांमध्ये एका सीमावर्ती भूभागावरून युद्ध सुरू झाले.

कागदावर पाहिलं तर निकाल आधीच ठरलेला वाटत होता.

लिबियाकडे सुमारे ७,००० सैनिक, ३०० रणगाडे (टँक्स), ६० लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती.

तर दुसरीकडे चाडकडे रणगाडेच नव्हते.

पण त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जी लिबियाकडे नव्हती…

टोयोटा पिकअप गाड्या.

या गाड्यांच्या मागील बाजूस त्यांनी मशीनगन आणि रॉकेट लॉन्चर बसवले होते.

म्हणजे ही लढाई एसयूव्ही विरुद्ध रणगाडे अशी होती !

निकाल काय लागणार, हे कोणालाही सहज सांगता आलं असतं.

पण प्रत्यक्षात घडलं अगदी उलट.

१९८७ मध्ये फाडा (Fada) येथे झालेल्या लढाईत चाडच्या टोयोटांनी लिबियाच्या रणगाडा ब्रिगेडचा अक्षरशः धुव्वा उडवला.

या लढाईत लिबियाचे तब्बल १०० रणगाडे नष्ट झाले, तर चाडने गमावल्या फक्त ३ टोयोटा गाड्या.

यानंतर चाडच्या सैन्याने ओउआदी डूम (Ouadi Doum) या लिबियन हवाई तळावर हल्ला केला.

या तळाचे संरक्षण ५,००० सैनिक करत होते आणि आजूबाजूला दाट माइनफिल्ड पसरवलेले होते.

पण टोयोटा गाड्या जवळपास १०० किमी प्रतितास वेगाने धावत होत्या. त्या इतक्या हलक्या आणि वेगवान होत्या की अनेक सुरूंग त्यांच्यामुळे सक्रियच झाले नाहीत.

त्यांनी थेट हवाई तळावर धडक मारून तो उद्ध्वस्त केला.

इतक्यावरच ते थांबले नाहीत.

चाडच्या सैन्याने लिबियाच्या सीमेत तब्बल २०० किलोमीटर आत घुसून आणखी एका हवाई तळावर अचानक हल्ला केला.

या कारवाईत त्यांनी ७० रणगाडे आणि ३० विमाने नष्ट केली.

महागडे, जड आणि शक्तिशाली रणगाडे या हलक्या आणि वेगवान टोयोटांचा पाठलाग करू शकत नव्हते.

यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण होतं.

टोयोटा बिघडली तर जवळपास प्रत्येक गावात तिची दुरुस्ती करणारा मेकॅनिक मिळत असे.

ती पुन्हा काही तासांत रस्त्यावर येत असे.

पण रणगाड्याची चेन तुटली किंवा एखादा महत्त्वाचा भाग निकामी झाला, तर तो रणगाडा युद्धात निरुपयोगी ठरत असे.

शेवटी इतिहासाने एक अनपेक्षित निकाल नोंदवला.

टोयोटांनी रणगाड्यांना हरवलं. या युद्धाला पुढे “टोयोटा वार” असंच नाव पडलं !

यातून मिळणारा धडा स्पष्ट आहे.

प्रत्येक वेळी मोठी ताकद, मोठा खर्च किंवा अत्याधुनिक साधनं जिंकतीलच असं नसतं.

अनेकदा वेग, चपळाई आणि परिस्थितीनुसार स्वतःच्या ताकदीचा योग्य वापर हेच विजयाचं खरं गमक ठरतं.

याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी टोयोटा रणगाड्यांवर मात करेल किंवा हलकी साधनं नेहमीच जिंकतील.

पण कोणत्याही स्पर्धेत, व्यवसायात किंवा आयुष्यात पहिला प्रश्न हा असायला हवा—

“आपल्याकडे नेमकं काय आहे, आणि त्याचाच सर्वात मोठा फायदा कसा करून घेता येईल?”

अनेकदा विजय हा सर्वात शक्तिशाली व्यक्तीचा नसतो…

तो स्वतःच्या सामर्थ्याचा सर्वात हुशारीने वापर करणाऱ्याचा असतो.

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian, उरण महाविद्यालय)

लायब्ररी हेल्पलाईन नंबर- 9892798322

( please visit library-blog for more articles )