एडिसनचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर एक महान संशोधक उभा राहतो

एडिसनचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर एक महान संशोधक उभा राहतो.

ज्याने विद्युत दिवा बनवला. फोनोग्राफ. चित्रपट तंत्रज्ञानातील प्रयोग.

टेलिफोनमधील आवाज अधिक स्पष्ट आणि मोठा करणारी सुधारणा. अशा अनेक मानवोपयोगी शोधांचा जनक म्हणून एडिसन आपल्याला माहित आहे.

पण एडिसनकडे आणखी एक कौशल्य होतं—ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही.

त्याला “प्रसिद्धी” मिळवता येत होती.

लोकांचं लक्ष कुठे वळवायचं, चर्चेचा मुद्दा कसा बदलायचा आणि जनमत आपल्या बाजूने कसं घडवायचं, हे त्याला उत्तम समजत होतं.

एका ठिकाणी त्याने या कौशल्याचा अत्यंत निर्दयीपणे वापर केला. त्याची ही गोष्ट !

१८८० च्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत वीजव्यवस्था उभी राहत होती.

एडिसनची कंपनी डायरेक्ट करंट—म्हणजे DC प्रणालीच्या माध्यमातून अमेरिकन घरांमध्ये वीज पोहोचवत होती.

पण DC ची एक मोठी अडचण होती.

ती वीज फार लांब अंतरावर कार्यक्षमपणे पाठवता येत नव्हती. त्यामुळे ग्राहकांच्या जवळच ठिकठिकाणी छोटी वीजनिर्मिती केंद्रं उभारावी लागत होती.

शहर वाढलं की नवी केंद्रं उभारा. ग्राहक वाढले की आणखी वायरिंग करा.

ही पद्धत चालत होती; पण तिचा विस्तार महाग आणि अवघड होता.

दुसऱ्या बाजूला एडिसनचा स्पर्धक जॉर्ज वेस्टिंगहाऊस अल्टरनेटिंग करंट—म्हणजे AC प्रणाली पुढे नेत होता.

निकोला टेस्लाच्या ट्रान्सफॉर्मरच्या संशोधनामुळे AC प्रणाली अधिक प्रभावी झाली होती. ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने तिचं व्होल्टेज वाढवून वीज लांब अंतरावर पाठवता येत होती आणि घरात पोहोचण्यापूर्वी ते पुन्हा कमी करता येत होतं.

याचा अर्थ साधा होता.

AC अधिक अंतरापर्यंत पोहोचत होती.

अधिक लोकांना वीज देऊ शकत होती.

आणि तिचं जाळं उभारणं तुलनेने स्वस्त पडत होतं.

एडिसनला हे दिसत नव्हतं असं नाही.

उलट, ते त्याला फार स्पष्टपणे दिसत होतं.

ग्राहकांनी जर फक्त तंत्रज्ञानाची क्षमता, किंमत आणि विस्ताराची सोय पाहिली, तर AC त्याच्या DC व्यवसायाला मागे टाकणार होती.

मग अशा वेळी काय करायचं?

तुम्ही तुलना जिंकू शकत नसाल, तर तुलनेचा निकषच बदला. एडिसनने इथे त्याची सर्वाधिक चतुर (आणि लबाड) खेळी खेळली.

त्याच काळात न्यूयॉर्क राज्य फाशीच्या शिक्षेला पर्याय शोधत होतं. अल्फ्रेड साउथविक नावाच्या एका दंतवैद्याला वाटत होतं की विजेच्या धक्क्याने मृत्युदंड देणं अधिक वेगवान आणि तुलनेने मानवी ठरू शकेल. (असं म्हणतात की काही राजकारण्यांना हाताशी घेऊन एडिसनने स्वतःच ही कल्पना पुढे आणली होती. मात्र तास ठोस पुरावा उपलब्ध नाही.) अल्फ्रेड साउथविक याने एडिसनला यासाठी संपर्क केला. या कामासाठी कोणता विद्युत प्रवाह वापरावा, असा प्रश्न एडिसनला विचारण्यात आला.

एडिसनने यासाठी चक्क AC ची शिफारस केली.

ही तीच प्रणाली होती, जी त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी जॉर्ज वेस्टिंगहाऊस विकत होता.

मात्र एखाद्या तटस्थ वैज्ञानिकाने केलेली निरागस तांत्रिक सूचना नव्हती.

प्राण्यांना विजेचे धक्के देण्यात आले.

पत्रकारांना बोलावण्यात आलं.

प्रात्यक्षिकं आयोजित करण्यात आली. या चाचण्या पूर्ण होताच एडिसन आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी AC किती प्राणघातक आहे, हे लोकांसमोर दाखवायला सुरुवात केली.

कालपर्यंत घरं उजळवणारी वीज अचानक लोकांसमोर मृत्यूचं साधन म्हणून उभी केली जाऊ लागली.

प्रतिमा बदलली की वास्तवाकडे पाहण्याची नजरही बदलते.

एडिसनच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या हॅरॉल्ड ब्राउनने पहिली इलेक्ट्रिक चेअर तयार करण्यात मदत केली. त्या खुर्चीत जाणीवपूर्वक वेस्टिंगहाऊसशी संबंधित AC उपकरणं वापरण्यात आली.

एडिसनने विजेच्या धक्क्याने मृत्युदंड देण्यासाठी ‘Westinghoused’ हा शब्द वापरात आणण्याचाही प्रयत्न केला.

जणू एखाद्या कंपनीचं नावच त्याला मृत्यूचा समानार्थी शब्द बनवायचा होता.

AC हे केवळ दुसरं तंत्रज्ञान नाही. AC म्हणजे मृत्यू देणारी वीज.

आज एखाद्या ब्रँडला असुरक्षित, देशविरोधी, आरोग्यास अपायकारक किंवा अविश्वसनीय ठरवण्यासाठी ज्या पद्धतीने मोहिमा चालवल्या जातात, त्यांची ही जुनी आवृत्ती होती.

उत्पादनावर हल्ला करण्याऐवजी त्याच्या प्रतिमेवर हल्ला करा.

एकदा लोकांच्या मनात भीती बसली की तांत्रिक माहिती समजावून सांगण्याचं काम फार कठीण होतं.

ऑगस्ट १८९० मध्ये विल्यम केम्लर हा इलेक्ट्रिक चेअरवर मृत्युदंड दिला गेलेला पहिला माणूस ठरला.

ही पद्धत जलद, स्वच्छ आणि मानवी आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होता.

प्रत्यक्षात घडलं उलटंच.

पहिल्या विजेच्या धक्क्याने केम्लरचा मृत्यू झाला नाही.

यंत्र पुन्हा सुरू करावं लागलं.

नंतर अधिक शक्तिशाली विजेचा धक्का देण्यात आला. उपस्थित लोकांसमोर त्याचं शरीर जळू लागलं.

ज्या पद्धतीला आधुनिक आणि मानवी म्हणून सादर करण्यात आलं होतं, ती एक भयावह सार्वजनिक घटना ठरली.

स्वतः वेस्टिंगहाऊसने नंतर म्हटल्याचं सांगितलं जातं—

“कुऱ्हाडीने यापेक्षा चांगलं काम झालं असतं.”

एडिसनच्या मोहिमेने AC बद्दल लोकांच्या मनात शंका आणि भीती निर्माण केली. आणि त्यामुळे जवळपास पुढील एक दशक AC चा वापर मर्यादित राहिला.

पण मार्केटिंग कितीही ताकदवान असलं, तरी ते चांगल्या स्पर्धक उत्पादनाची मूलभूत क्षमता कायमची लपवू शकत नाही.

AC प्रणालीने लांब अंतरावर वीज पाठवणं स्वस्त होत होतं. वेगाने आणि स्वस्तात सर्वदूर वीज पाठविणे शक्य होत होते. शेवटी AC आधुनिक वीजव्यवस्थेचा पाया बनली.

एडिसन करंटचं युद्ध हरला.

पण या युद्धाने मार्केटिंगबद्दल एक अस्वस्थ करणारं सत्य उघड केलं.

*तुमचं उत्पादन गुणवत्तेच्या तुलनेत जिंकत नसेल, तर तुम्ही स्पर्धेचं मैदान बदलू शकता*.

*स्वतःची ताकद सांगण्याऐवजी प्रतिस्पर्ध्याची जोखीम वाढवून दाखवू शकता.*

*आपलं उत्पादन आकर्षक करण्याऐवजी दुसरा पर्याय भयानक वाटेल, अशी प्रतिमा तयार करू शकता.*

*पण —हे काही काळ चालतं.

अनेकदा बराच काळ चालतं.

कारण लोक आकडेवारीपेक्षा कथा पटकन स्वीकारतात.

अभ्यासू तुलनेपेक्षा भीतीला वेगाने प्रतिसाद देतात.

एखाद्या उत्पादनाची तांत्रिक माहिती समजून घेण्यासाठी वेळ लागतो; पण “हे धोकादायक आहे” हे एक वाक्य पुरेसं ठरतं.

*आजही व्यवसायात हेच घडतं.*

एखादी कंपनी स्वतःच्या सॉफ्टवेअरची वैशिष्ट्यं सांगण्याऐवजी प्रतिस्पर्ध्याच्या डेटासुरक्षेबद्दल भीती निर्माण करते.

एखादा राजकीय पक्ष स्वतःच्या कामगिरीऐवजी विरोधक सत्तेत आला तर काय संकट येईल, याची चित्रं रंगवतो.

*एखादा कर्मचारी स्वतःच्या क्षमतेपेक्षा दुसऱ्या सहकाऱ्याच्या चुका ठळक करतो.*

एखादा ब्रँड आपलं उत्पादन चांगलं आहे असं सांगत नाही; तो बाकीची उत्पादनं वापरणं म्हणजे धोका आहे, असं सुचवतो.

रणनीती जुनी आहे.

फक्त माध्यमं बदलली आहेत.

शक्तिशाली संवाद लोकांच्या मनात खोटं सत्य म्हणून उभं करू शकतो.

पण फक्त तोपर्यंतच—

जोपर्यंत वास्तव स्वतःचा “स्विच” चालू करत नाही.

( संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय, उरण )

लायब्ररी हेल्पलाईन- 9892798322

(Please visit library-blog for more articles )