“Survival of the fittest” चा खरा अर्थ

मानववंशशास्त्रज्ञ Margaret Mead यांना एकदा विचारण्यात आलं —
“मानवी संस्कृतीची सुरुवात झाली, याचा पहिला पुरावा कोणता?”
दगडी हत्यारं? मातीची भांडी? शेती? आग?
त्यांनी उत्तर दिलं —
“जुळून आलेलं तुटलेलं मांडीचं हाड.”

जंगलात राहणाऱ्या एखाद्या प्राण्याचा पाय मोडला, तर त्याचं जगणं कठीण होतं. त्याला शिकार करता येत नाही. अन्न शोधता येत नाही. पाण्यापर्यंत जाणं अवघड होतं. शिकाऱ्यापासून पळता येत नाही.
मग हजारो वर्षांपूर्वीच्या एखाद्या माणसाचं तुटलेलं मांडीचं हाड पूर्णपणे जुळलं असेल, तर त्या काळात काय घडलं असेल?
कदाचित कोणीतरी त्याच्यासाठी अन्न आणलं असेल.
कोणीतरी पाणी दिलं असेल.
रात्री हिंस्र प्राण्यांपासून त्याचं संरक्षण केलं असेल.
कदाचित काही आठवडे किंवा महिने त्याची काळजी घेतली असेल.
तो माणूस त्या समूहासाठी त्या काळात फारसा “उपयोगी” नसतानाही त्याला सोडून दिलं गेलं नाही.
म्हणून या कथेतला विचार सुंदर आहे—
माणसाने दगडापासून अवजारे / हत्यारे बनविली , तेव्हा कदाचित तंत्रज्ञान सुरू झालं असेल.
पण जायबंदी माणसाला पुन्हा उभं राहेपर्यंत सांभाळलं, तेव्हा कदाचित माणुसकी सुरू झाली.

अशीच एक गोष्ट दक्षिण आफ्रिकेतील एका सिंहिणीची.
तिचं नाव Josie.
वय वाढत गेलं तशी Josie ची दृष्टी कमी होत गेली. एक डोळा पूर्णपणे निकामी झाला आणि दुसऱ्यानेही तिला फारसं दिसत नव्हतं.
जंगलाच्या भाषेत पाहिलं, तर ही जवळजवळ मृत्युदंडाचीच शिक्षा.
सिंहिणीला शिकार करायची आहे. पाणी शोधायचं आहे. इतर प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करायचा आहे.
त्यासाठी डोळेच साथ देत नसतील तर?
पण Josie जवळ एक गोष्ट होती.
तिच्या दोन मुली—Dawn आणि Duffy.
त्या आईला सोडून गेल्या नाहीत.
त्या तिच्यासोबत राहिल्या. शिकार केली. तिला अन्नापर्यंत पोहोचण्यास मदत केली. तिच्या आसपास राहिल्या.
जवळजवळ अंध झालेली Josie जंगलात आणखी अनेक वर्षं जगू शकली.
आता या दोन कथा एकमेकांच्या शेजारी ठेवा.
एका बाजूला हजारो वर्षांपूर्वीचा एक जखमी माणूस.
दुसऱ्या बाजूला आफ्रिकेच्या जंगलातली एक अंध सिंहिण.
दोघांकडेही स्वतःच्या बळावर जगण्याची पूर्ण क्षमता उरलेली नव्हती.
तरीही ते जगले.
कारण कदाचित जगण्यासाठी फक्त आपली ताकद पुरेशी नसते.
कधी कधी दुसऱ्याची ताकद आपल्यासाठी उभी राहते.

आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलो आहोत—
“Survival of the fittest.”
आणि नकळत त्याचा अर्थ आपण असा लावतो—
सगळ्यात ताकदवान टिकतो.
सगळ्यात हुशार पुढे जातो.
कमकुवत मागे पडतो.
पण हा निसर्ग नियम इतका सरळ नाही.

“fittest” म्हणजे फक्त सर्वात बलवान व्यक्ती नाही.
एकमेकांची काळजी घेणारा समूहही एक प्रकारे अधिक fit असतो.
आपण मुलांना स्वतंत्र व्हायला शिकवतो. स्वतःच्या पायावर उभं राहा. कोणावर अवलंबून राहू नका. सक्षम व्हा. स्पर्धेत पुढे जा.
हे सगळं आवश्यक आहे.
पण आयुष्यात प्रत्येक माणसाच्या वाट्याला असा काळ येऊ शकतो, जेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही.
कधी आजारामुळे.
कधी वयामुळे.
कधी आर्थिक संकटामुळे.
कधी मानसिक थकव्यामुळे.
आणि त्या क्षणी तुमचं शिक्षण, पैसा, पद किंवा बुद्धिमत्ता यापेक्षा एक वेगळीच संपत्ती महत्त्वाची ठरते—
तुमच्या आसपासची माणसं.
ज्यांना तुम्ही काही देऊ शकत नसतानाही जी तुमच्यासोबत राहतात.
कदाचित म्हणूनच एखाद्या समाजाची प्रगती त्याच्याकडे किती उंच इमारती आहेत, किती वेगवान इंटरनेट आहे किंवा किती प्रगत तंत्रज्ञान आहे यावरूनच मोजता येत नाही.
एक दुसरी कसोटीही असायला हवी.
ज्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही, त्यांच्याशी तो समाज कसा वागतो?
वृद्ध माणूस.
दिव्यांग व्यक्ती.
आजारी सहकारी.
अडचणीत आलेला मित्र.
कमाई थांबलेला कुटुंबातील सदस्य.
त्यांची “उपयुक्तता” कमी झाली की आपलं त्यांच्याबद्दलचं प्रेमही कमी होतं का?

आपल्याकडे आज औषधं आहेत, हॉस्पिटल्स आहेत, विमा आहे, स्मार्टफोन आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्ताही आहे.
पण मानवी सभ्यता किती पुढे गेली हे ठरवणारा प्रश्न कदाचित अजूनही तोच आहे तो म्हणजे..
प्रगतीच्या वाटेवर आपण किती पुढे गेलो, यापेक्षा मागे पडणाऱ्या कोणासाठी थांबलो काय ?
—कदाचित तिथेच सभ्यतेचा खरा अर्थ दडलेला आहे.

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय, उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322

( Please visit library-blog for more articles )