लिफ्ट आणि आरसा

एका कंपनीमध्ये तेथील कर्मचारी लिफ्ट खूप हळू चालत असल्याची तक्रार करत होते. मजल्यांवरून ये-जा करण्यासाठी खूप वेळ लागत होता, ज्यामुळे लोकांचा कामातील वेळ वाया जात होता आणि त्यांची चिडचिड होत होती. लोक लिफ्ट लवकर चालेल या आशेने बटणे वारंवार दाबत असत.

(मोबाईल फोन येण्याच्या आधीची गोष्ट!)
कंपनी व्यवस्थापनाने या समस्येवर तोडगा काढायचे ठरवले. त्यांनी लिफ्ट बनवणाऱ्या कंपनीला बोलावून त्यांचा सल्ला मागितला. तज्ञांनी लिफ्टचे सर्वेक्षण केले आणि एक अत्यंत महागडा उपाय सुचवला. त्यांनी सांगितले की, “आम्ही अधिक मजबूत केबल्स, एक अधिक शक्तिशाली मोटर आणि अत्याधुनिक प्रणाली बसवून ही समस्या कायमची सोडवू शकतो.” हा उपाय लिफ्टला अधिक वेगवान बनवणार होता.

व्यवस्थापन या महागड्या उपायावर विचार करत असतानाच, एका कनिष्ठ अधिकाऱ्याने एक साधा पण वेगळा प्रश्न विचारला: “कर्मचाऱ्यांचा जेवणाच्या वेळी किंवा कॉफी पिताना कितीतरी जास्त वेळ वाया जातो मात्र तेव्हा कोणी तक्रार करत नाही. मग लिफ्ट मध्ये वेळ जातो त्याचीच एवढी तक्रार का होत असेल बरे?”
त्याच्या लक्षात आले की इतर वेळी कर्मचारी खात असतात किंवा बोलत असतात… म्हणजे गुंतलेले (engaged)असतात. मात्र लिफ्टमध्ये ते engaged नसतात, त्यामुळे वेळ गेलेला जाणवतो.
त्याला एक उपाय सुचला – जर आपण लिफ्टमध्ये जमिनीपासून छतापर्यंत मोठे आरसे लावले तर काय होईल? जेणेकरून मजल्यांवरून वर-खाली जाताना कर्मचारी स्वतःला पाहू शकतील — आपले रूप न्याहाळू शकतील, केस किंवा कपडे व्यवस्थित करू शकतील?”
हा उपाय अत्यंत कमी खर्चाचा होता, पण त्यामुळे मूळ समस्या सुटेल का? लिफ्टचा वेग तर तेवढाच राहणार होता. आश्चर्य म्हणजे, या उपायाने केवळ समस्येचे निराकरण झाले नाही, तर तक्रारी पूर्णपणे थांबल्या.
एकदा लिफ्टमध्ये आरसे लावले गेल्यानंतर कोणीही तक्रार केली नाही. लिफ्टचा वेग पूर्वीइतकाच होता, पण लोकांचा अनुभव पूर्णपणे बदलला होता. आता लिफ्टमध्ये शिरल्यावर लोकांचे लक्ष ‘किती वेळ लागतोय’ या विचारावरून हटून स्वतःच्या प्रतिमेवर केंद्रित झाले. लोक स्वतःला आरशात पाहू लागले, आपले कपडे, केस व्यवस्थित करू लागले. त्यांना त्यांच्या अधीरतेवर आणि कंटाळ्यावर मात करण्यासाठी काहीतरी करण्यासारखे मिळाले. त्यांचे मन दुसऱ्या गोष्टीत गुंतल्यामुळे वेळेचा विचार मागे पडला. समस्या लिफ्टच्या वेगात नव्हतीच, तर लोकांच्या मानसिक अवस्थेत होती.
समस्या ‘वेळेची’ नव्हती, तर ‘वेळेच्या जाणिवेची’ होती.
कंपनीने लक्षणांवर (symptoms) उपचार करण्याऐवजी मूळ कारणावर (root cause) काम केले. आपणही आपल्या जीवनातील समस्यांचे विश्लेषण करताना हेच करायला हवे. जर तुम्हाला कामाचा ताण जाणवत असेल, तर खरी समस्या जास्त काम आहे की तुमचे वेळेचे नियोजन (Time Management) चुकतेय? जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल, तर समस्या त्या व्यक्तीच्या वागण्यात आहे की तुमच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षांमध्ये? जेव्हा आपण खऱ्या समस्येच्या मुळाशी जातो, तेव्हाच आपल्याला आरशासारखा साधा पण प्रभावी उपाय सापडतो.

आपल्या आयुष्यातही अनेक “हळू चालणाऱ्या लिफ्ट्स” असतात. जसे की, करिअरमध्ये अपेक्षित प्रगती न मिळणे, नातेसंबंधात सुधारणा होण्यासाठी वेळ लागणे, किंवा एखादे ध्येय साध्य होण्यास विलंब लागणे. या परिस्थितीत आपण अनेकदा बाह्य परिस्थितीला दोष देतो. “माझा बॉस चांगला नाही,” “नशीब साथ देत नाही,” “परिस्थितीच बिकट आहे” अशा तक्रारी करतो. पण या लिफ्टच्या गोष्टीप्रमाणे, खरी समस्या अनेकदा बाह्य जगात नसते, तर आपल्या दृष्टिकोनात असते. आपण समस्येकडे कसे पाहतो (Power Of Perspective) यावर सर्वकाही अवलंबून असते. जर आपण आपला दृष्टिकोन बदलला, आपले लक्ष निराशेच्या भावनेवरून हटवून काहीतरी सकारात्मक किंवा विधायक गोष्टीवर केंद्रित केले, तर तोच ‘वेळ’ कमी त्रासदायक वाटू लागतो.

म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की आयुष्याची लिफ्ट खूप हळू चालली आहे, तेव्हा तक्रार करण्याऐवजी किंवा अधीर होण्याऐवजी, क्षणभर थांबा आणि स्वतःच्या आत डोकावून पाहा. कदाचित तुम्हाला फक्त एका ‘वैचारिक आरशाची’ गरज असेल, जो तुम्हाला दाखवून देईल की खरी शक्ती परिस्थिती बदलण्यात नाही, तर दृष्टिकोन बदलण्यात आहे…

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय
उरण – रायगड)
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )

पॉवर ऑफ रिफ्रेमिंग

सत्तरच्या दशकात अमेरिका रशिया यांच्यातील शितयुद्धाचा काळ.
​अमेरिकेत व्हल्कन नावाचे एक छोटेशे गाव होते. खूपच लहान गाव होते ते. १९५० च्या दशकात कोळसा खाणीच्या तेजीत हे गाव वसले, पण खाणी बंद झाल्यानंतर १९७० पर्यंत ते ओस पडले. तिथे फक्त २० कुटुंबे राहत होती.
​हे गाव टग नदीच्या काठी होते. नदीच्या एका बाजूला वेस्ट व्हर्जिनिया आणि दुसऱ्या बाजूला केंटकी राज्य होते.

​गावातील मुलांना शाळेत जाण्यासाठी नदी ओलांडावी लागत असे. पण, जुना पूल पूर्णपणे तुटून पडला होता. त्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागत— त्यांना एका कुलूपबंद रेल्वेच्या कुंपणावरून चढून जावे लागे आणि त्यानंतर मालगाड्यांच्या रेल्वेचा पूल ओलांडून जावे लागे. हे खूप धोकादायक होते, आणि एकदा तर एका मुलाला रेल्वे पूल ओलांडताना झालेल्या अपघातात पाय गमवावा लागला.

​व्हल्कन मधील रहिवाशांच्या वतीने बोलण्यासाठी जॉन रॉबिनेट्ट यांची गावकऱ्यांनी निवड केली.
रॉबिनेट्ट यांनी काउंटीच्या अधिकाऱ्यांकडे नवा पूल बांधण्याची विनंती केली. त्यांनी नकार दिला. कारण एवढ्या कमी लोकसंख्येसाठी पूल उभारण्याचे बजेट नाही…आणि इतर महत्वाच्या प्रश्नांपुढे हा गौण प्रश्न आहे.
​त्यांनी केंटकी राज्याच्या अधिकाऱ्यांना विचारले. त्यांनीही नकार दिला, “आमच्याकडे त्याहून मोठ्या समस्या आहेत.”
​त्यांनी वेस्ट व्हर्जिनिया राज्याच्या अधिकाऱ्यांना विचारले. त्यांनीही नकार दिला.
​शेवटी, त्यांनी वॉशिंग्टन डीसी येथील केंद्र सरकारला विचारले. त्यांनीही नकार दिला, कारण तेच की एवढ्या छोट्या लोकसंख्येच्या गावासाठी बजेट नाही.

​यावरून रॉबिनेट्ट यांना हे स्पष्ट झाले की कुणीही दखल घेत नाही. कारण त्यांचे गाव आणि त्यांचा प्रश्नच इतका लहान आहे की कोणाला दखल घ्याविशीच वाटत नाही. त्यांना कळलं की आपली खरी स्पर्धा इतर मोठ्या प्रश्नांशी आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या पुलाच्या समस्येला इतर समस्यांपेक्षा मोठे करावे लागणार आहे.

​१९७७ मध्ये रशिया-अमेरिका शीतयुद्ध शिगेला पोहोचले होते आणि त्यावेळी रशिया हीच एकमेव समस्या होती ज्याची अमेरिकेला काळजी होती. दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सतत संधीच्या शोधात होते.

रॉबिनेट्ट यांना समजले की खालील स्तरावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात काही अर्थ नाही. त्यांना थेट वरच्या स्तरावरील लोकांना धक्का द्यावा लागणार होता.

​त्यांनी चक्क वॉशिंग्टन डीसी येथील रशियन दूतावासाला पत्र लिहिले.
​त्यांनी पत्रात व्हल्कन गावातील वाईट परिस्थितीबद्दल सांगितले आणि अमेरिकेला साधा एक पूलही बांधणे परवडत नाही, असे नमूद केले. त्यांनी रशियाकडे गरीब देशांसाठी परदेशी मदत (Foreign Aid) देण्याचा अर्थसंकल्प आहे, याची आठवण करून दिली आणि विचारले, “जे अमेरिका करू शकत नाही, ते रशियन मदतीने पूर्ण होऊ शकते का?”

रशियन हुशार होते. त्यांना ही गोष्ट मोठी प्रचाराची संधी (Propaganda Campaign) आहे हे कळले. अमेरिकेला स्वतःच्याच नागरिकांना मदत करता येत नाही, हे जगभर पसरवण्याची ती संधी होती. त्यांनी तात्काळ इओना अँड्रोव्ह नावाच्या पत्रकाराला व्हल्कनला भेट देण्यासाठी पाठविले.
​पण, रशियन दूतावासाला अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याची परवानगी घेणे आवश्यक होते.

​जेव्हा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना एका रशियन पत्रकाराला “अमेरिकेतील छोट्याश्या गावात” जाण्याचे कारण कळले आणि त्यांनी व्हल्कनच्या पुलाची कहाणी ऐकली, तेव्हा गोष्टी वेगाने बदलू लागल्या.
​या घटनेमुळे संपूर्ण जगात अमेरिकेची खिल्ली उडू शकली असती.
​केंद्र सरकारने राज्याला सांगितले: “आत्ताच्या आत्ता ही समस्या सोडवा!”
राज्याने काउंटीला सांगितले: “आत्ताच्या आत्ता ही समस्या सोडवा!”
​आणि काही तासांतच रॉबिनेट्ट यांना कळविण्यात आले की, व्हल्कनसाठी नवीन पूल बांधण्यासाठी $१.३ दशलक्ष (आजचे $५.२ दशलक्ष) मंजूर झाले आहेत.
​अचानक, त्यांची समस्या मोठी झाली होती !

रॉबिनेट्ट यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या समस्येकडे पहिले आणि छोट्या समस्येला इतरांच्या समस्यांपेक्षा मोठे (प्राधान्यक्रमात वर) करण्याचा मार्ग शोधला.

मित्रांनो ही आहे Power of Reframing. आपल्या प्रश्नांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची किमया !
थोडासा दृष्टिकोनातील बदल अनेक गहन प्रश्नांवर उत्तरे शोधून देऊ शकतो..

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर- 9892798322
(Please visit library-blog for more articles)

गुरु प्रेम

रॉजर फेडरर हा टेनिस जगातील सम्राट आहे. एक महान टेनिस खेळाडू म्हणून त्याने नाव तर कमावलं आहेच पण त्यासोबत तो एक चांगला माणूसही आहे ….आणि म्हणूनच बहुदा त्याचे चाहते जगभर आहेत. रॉजरच्या त्याच्या गुरुप्रती असलेल्या प्रेमाचे एक उदाहरण नुकतंच वाचनात आलं..

फेडररचे टेनिस स्किल्स लहानपणीच दिसू लागले होते. पण त्याच्यातील क्षमता ओळखून फेडररला तांत्रिक आणि मानसिक पातळीवर जगज्जेता खेळाडू बनविण्याचे काम केले कोच पीटर कार्टर यांनी. पीटर कार्टर हे ऑस्ट्रेलियन खेळाडू होते. सततच्या दुखापतींमुळे त्यांचे टेनिस करिअर रुळावर येत नव्हते. थोडे पैसे कमावून पुन्हा प्रोफेशनल टेनिस कडे वळावे या उद्देशाने त्यांनी स्वित्झर्लंड मध्ये एक तीन महिन्यांची कोचिंग असाइनमेंट स्वीकारली. याच वेळी त्यांना फेडरर सापडला आणि पुढे इतिहास घडला.

तीन महिन्यांसाठी सुरु केलेले कोचिंग करिअर हेच पुढे पीटर कार्टर यांचे मुख्य करिअर बनले. रॉजर फेडररला त्याचा प्रसिद्ध बॅकहॅन्ड शिकविण्यात पीटर कार्टर यांचा प्रमुख सहभाग होता. खेळात चांगला असला तरी रॉजर फेडरर एक गरम डोक्याचा खेळाडू होता. लगेच रागवायचा आणि रागाच्या भरात गेमवरील फोकस आणि नियंत्रण दोनीही हरवून बसायचा. पीटर कार्टर त्याला नेहमी मानसिक पातळीवर तयार करण्यासाठी प्रयत्न करत. जर तू स्वतःमध्ये हा बदल केला नाहीस तर तुझे करिअर अपेक्षित उंचीवर न पोहोचता अचानक संपून जाईल असे ते त्याला नेहमी सांगत.

२००२ साली टोरोंटो मध्ये खेळत असताना रॉजरच्या कानावर एक बातमी आली, जिने रॉजर फेडररचे आयुष्य कायमचे बदलून गेले. दक्षिण आफ्रिकेमध्ये एका कार अपघातात कोच कार्टर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रॉजर फेडरर ने गंभीरपणे आपल्या खेळाकडे बघायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये कमालीचा बदल झाला.
पुढच्याच वर्षी २००३ मध्ये रॉजर फेडरर पहिल्यांदाच विम्बल्डन मध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकला. आणि पुढे जिंकतच गेला.

पीटर कार्टरचे आई-वडील ऑस्ट्रेलिया मध्ये राहतात. जेव्हा जेव्हा फेडरर ऑस्ट्रेलिया मध्ये खेळला तेव्हा तेव्हा त्याने आपल्या प्रशिक्षकाच्या आईवडिलांना आवर्जून सामन्याची तिकिटे पाठवली. सोबत विमानप्रवासाची तिकिटे, हॉटेल बुकिंग आणि जाण्यायेण्यासाठी कारची देखील सोय केली. कार्टरचे आई वडील मात्र केवळ फायनल असेल तरच जात असत …. आणि ते देखील फेडरर फायनल मध्ये खेळत असला तरच !

जेव्हा जेव्हा फेडरर ऑस्ट्रेलियात जिंकला आहे तेव्हा तेव्हा कार्टरचे आईवडील विशेष पाहुण्यांच्या गॅलरीत बसून सामना पाहात होते. अगदी फेडररच्या निवृत्ती पर्यंत !

आपल्याकडे कितीही कौशल्य असलं तरी गुरु, मार्गदर्शक आणि शिस्त यांचं महत्त्व प्रचंड आहे. फेडररसारखा दिग्गज खेळाडूही आपल्या गुरुंच्या आठवणीने नम्र राहतो आणि त्यांचे ऋण फेडतो.
आपणही आपल्या जीवनात असे प्रश्न विचारायला हवे –
👉 “माझ्या जीवनात कोण मला मार्गदर्शन करतो आहे?”
👉 “माझ्या यशात मला कोणाकोणाची मदत झाली आहे ?”
👉 “मी त्यांच्या प्रती ऋणी आहे का ?”
All the best 👍

(संकलन – श्याम धारासूरकर Librarian उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )

साडेतीन टक्क्यांचा नियम

काही दिवसांपूर्वीच नेपाळ मध्ये सरकार उलथून देणारी हिंसक चळवळ झाली. अनेकांना अशी चळवळ भारतात होईल अशी भीती वाटली आणि अनेकांना अशी चळवळ भारतात व्हावी अशी इच्छा देखील झाली.
तेव्हा सर्वाना ३ .५ % च्या नियमाची आठवण झाली.
मानवजातीच्या इतिहासात सत्ताधारी वर्ग आणि सामान्य लोक यांच्यात संघर्ष नेहमीच झाला आहे. हा संघर्ष कधी शांततामय बंद किंवा निदर्शने करून झालेला आहे तर अनेकदा रक्तरंजित युद्धाच्या स्वरूपात दिसला आहे.

हार्वर्ड मधील राज्यशास्त्र अभ्यासक एरिका चेनोवेथ यांनी जगभरातील अशा आंदोलनांचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातूनच त्यांनी “साडे तीन टक्क्यांचा नियम” मांडला आहे.

एरिका चेनोवेथ आणि संशोधक मारिया स्टेफन यांनी १९०० ते २००६ या कालावधीतील जगभरातील राजकीय आंदोलनांचे कठोर विश्लेषण केले.
एकूण आदोलनांपैकी केवळ यशस्वी आंदोलनांचा आणखी अभ्यास केला. त्यांना अशी ३२३ आंदोलने आढळली.

यशस्वी आंदोलनाचे निकषही स्पष्ट होते –
१ . आंदोलनाच्या कृतीमुळे एका वर्षाच्या आत सत्ताबदल झाला पाहिजे.
२ . हा बदल केवळ आंदोलनानेच झाला पाहिजे. परकीय सैन्याने हस्तक्षेप करून सत्ता बदलली, तर ते यश मानले जाणार नाही.
तसेच आंदोलनात स्फोट, अपहरण, मालमत्तेचे नुकसान वगैरे घडले असेल तर ते हिंसक मानले. अन्यथा ते अहिंसक अंदोलन म्हणून मानले.
(भारताचा स्वातंत्र्यलढा अंशतः यशस्वी मानण्यात आला होता. कारण अहिंसक मोहिमेच्या सर्वोच्च बिंदूपासून सत्तापालटाला एक वर्षापेक्षा जास्त अवधी लागला होता. यावरून चेनोवेथ यांच्या संशोधनाचे निकष किती कठीण होते याची कल्पना येते.)

या संशोधनाचे निकाल आश्चर्यचकित करणारे होते. चेनोवेथ यांच्या अभ्यासानुसार अहिंसक मोहिमांपैकी सुमारे ५३% वेळा राजकीय बदल साध्य झाले होते, तर हिंसक मोहिमांपैकी फक्त २६% वेळा. आणि अभ्यासातील २५ सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी, २० अहिंसक होती, व त्यापैकी १४ पूर्णपणे यशस्वी ठरली.
म्हणजेच अहिंसक मोहिमा हिंसक मोहिमांपेक्षा दुप्पट जास्त यशस्वी ठरल्या होत्या.

यातील काही उदाहरणांचा उल्लेख केलाच पाहिजे.

– १९८६ मध्ये फिलिपिन्समध्ये घडलेले पीपल पॉवर मूव्हमेंट हा इतिहासातील एक महत्वाचा टप्पा. लाखो लोकांनी प्रार्थना, गाणी आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात शांतपणे आंदोलन केले. फक्त चार दिवसांत काही दशकांपासून सत्तेत असलेले मार्कोस सरकार कोसळले.

– २००३ मध्ये जॉर्जियात घडलेली रोज रेव्होल्युशन ही देखील रक्ताशिवाय झालेली क्रांती होती. आंदोलनकर्त्यांनी संसदेत प्रवेश केला, पण त्यांच्या हातात बंदुका नव्हत्या तर गुलाब होते. हा प्रतीकात्मक क्षण लोकांच्या एकतेचे प्रतिक ठरला.

– १९८० च्या दशकात एस्टोनियामध्ये सिंगिंग रेव्होल्युशन घडली. लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून गाणी म्हणत सोव्हिएत युनियनविरुद्ध आवाज उठवला. हे आंदोलन इतके सामर्थ्यशाली ठरले की शेवटी एस्टोनियाला स्वातंत्र्य मिळाले.

– २०१९ मध्ये सुदान आणि अल्जेरियाचे दीर्घकालीन हुकूमशहा यांना पद सोडायला भाग पाडले गेले – तेही अहिंसक जनआंदोलनामुळे.

सामान्य जनतेला सरकार उलथून लावायचे असेल तर अहिंसक मार्गाने केलेले जनआंदोलन जास्त परिणामकारक ठरेल हे अभ्यासामुळे जगाला कळले. पण अहिंसक आंदोलनच का यशस्वी ठरते याचेही सखोल विवेचन चेनोवेथ यांनी केले आहे.

– नैतिक श्रेष्ठता: हिंसेच्या तुलनेत अहिंसक आंदोलन नैतिकदृष्ट्या अधिक स्वीकारले जाते. सामान्य नागरिक प्रशिक्षित सैनिक नसतात. त्यामुळे हिंसक आंदोलनापासून बरेच लोक दूर राहणे पसंद करतात.

– व्यापक सहभाग: संप, बहिष्कार, शांततामय मोर्चा – यासाठी शरीराने तंदुरुस्त असणे गरजेचे नाही. त्यामुळे समाजातील सर्व घटक जसे की वृद्ध, महिला, विद्यार्थी सर्वजण यात सहभागी होऊ शकतात.

– जास्त प्रसार: शांततामय आंदोलनाबाबत उघडपणे चर्चा करता येते, प्रसारमाध्यमांमध्ये जागा मिळते. हिंसक आंदोलन मात्र गुप्तपणे करावे लागते .त्यामुळे त्याचा प्रसार करताच येत नाही.

– सुरक्षादलांवर परिणाम: जेव्हा लाखो निरपराध लोक रस्त्यावर येतात, तेव्हा सैन्यदलातील अनेकांच्या नजरेसमोर त्यांचे कुटुंबीयच येतात. अशा वेळी ते कारवाई करण्यास धजत नाहीत.

या सर्व कारणांमुळे अहिंसक जनआंदोलन यशस्वी होण्याची शक्यता खूपच वाढते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अहिंसक जनआंदोलन यशस्वी होतेच. चेनोवीथ यांनी अहिंसक आंदोलनांच्या अपयशाचीही कारणमीमांसा केली आहे. आणि याबाबतच त्यांनी “साडे तीन टक्क्यांचा” नियम मांडला आहे.

त्यांच्यामते जेव्हा जेव्हा लोकसंख्येच्या किमान ३.५% लोक सक्रिय सहभाग घेतात, तेव्हा तेव्हा अपयशाची शक्यताच संपते.”

फिलिपिन्स, एस्टोनिया, जॉर्जिया – या साऱ्यांनी हा टप्पा गाठला आणि यश मिळवले.
पण १९५० च्या दशकात पूर्व जर्मनीतील ४ लाख लोक सहभागी झालेले आंदोलन अपयशी ठरले. कारण लोकसंख्येच्या फक्त २% लोक सहभागी झाले होते.
२०११ मधील बहारीन येथील उठाव सुरुवातीला मोठा होता, पण पुढे गटांत विभागला गेला आणि त्यामुळे अपयशी ठरला.

लोकसंख्येच्या साडेतीन टक्के लोकांनी जर सक्रिय सहभाग घेतला, आणि हे ऐक्य वर्षभर टिकून राहिले तर सत्तापालट अहिंसक मार्गाने करणे शक्य आहे.

भारताची लोकसंख्या १४५ कोटी आहे. साडेतीन टक्क्यांच्या नियमानुसार जवळपास पाच करोड लोक जेव्हा सत्ताबदलासाठी एकत्र येतील तेव्हा भारतासारख्या देशातही अशी चळवळ यशस्वी होऊ शकेल. परंतु १४५ कोटींची लोकसंख्या एकसंध नाही. ती वेगवगेळ्या भाषा/राज्य/धर्म/जाती यांमध्ये विखुरलेली आहे. आणि जोपर्यंत भारतीय मनाने विखुरलेले राहतील तोवर निर्णायक जनआंदोलन उभारणे भारतीयांना शक्यच होणार नाही.

आपल्याला नेहमी इतिहासात युद्धकथा, लढाया आणि रक्तपात यांच्याच गोष्टी सांगितल्या जातात. पण खरं तर जग बदलणारी मोठी ताकद ही सामान्य लोकांची, त्यांच्या अहिंसक पण ठाम आंदोलनाची आहे.

एरिका चेनोवेथ सांगतात –
“सामान्य लोकच हिंसा न करताही खरे शौर्य दाखवू शकतात. तेच जग बदलतात. पण त्यांना फार कमी वेळा गौरव मिळतो.”
शस्त्र नव्हे – तर दृढनिश्चय, ऐक्य आणि ३.५% लोकांचा सक्रिय सहभाग – हाच जग बदलण्याचा खरा मार्ग आहे.

संकलन – श्याम धारासूरकर, Librarian,उरण महाविद्यालय उरण
(लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322)

Please visit library-blog for more articles

संकटात ही संधी शोधणे

1889 मध्ये, अल्मोन स्ट्रॉजर (Almon Strowger) हा कॅन्सस सिटीमध्ये एक अंत्यसंस्कार करणारा (undertaker) होता.
त्याला मोकळ्या वेळेत नवनवीन गोष्टी शोधून काढायला आवडायचं. कारण त्याच्याकडे भरपूर वेळ असायचा.
याचे करण म्हणजे त्याचा व्यवसाय फारच खराब चालला होता.
त्याला कळेना की असं का होतंय, कारण ५०००० लोकसंख्येच्या शहरात त्याच्याव्यतिरिक्त दुसरा फक्त एकच undertaker होता.

पण सगळेजण दुसऱ्याकडे जात होते, कोणीही स्ट्रॉजरकडे येत नव्हतं.

एकदा त्याने पाहिलं की त्याचा एक मित्रसुद्धा मृत नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी दुसऱ्या undertaker कडे गेला.
त्याने मित्राला विचारलं, “माझ्याकडे का नाही आलास?”

मित्र म्हणाला की मी फोन केला होता, पण टेलिफोन एक्सचेंजवर काम करणाऱ्या महिलेने सांगितलं की स्ट्रॉजरचा फोन व्यस्त आहे.
मग तिने कॉल दुसऱ्या undertaker कडे वळवला.

स्ट्रॉजरला हे काही केल्या समजेना. कारण त्याचा फोन कधीच व्यस्त नसायचा. मग त्याने दुसऱ्या मित्राला सांगून एक्सचेंजला फोन करायला लावलं.
पण तो कॉलसुद्धा त्याचप्रमाणे दुसऱ्या undertaker कडे वळवण्यात आला.

थोडी शोधाशोध केल्यावर शेवटी त्याला कळलं की टेलिफोन एक्सचेंजवर जी बाई होती, ती दुसऱ्या undertaker ची पत्नी होती.
ती कायमच स्ट्रॉजरचे कॉल्स आपल्या नवऱ्याकडे वळवत होती!

त्या काळी फोनवर नंबर डायल करायचे नव्हते.
फोन लावल्यावर थेट टेलिफोन ऑपरेटर कॉल रिसिव्ह करायचा आणि तो हव्या त्या व्यक्तीकडे जोडून द्यायचा.
पण या बाईने मात्र सगळे कॉल आपल्या पतीकडे वळवून टाकले होते.
स्ट्रॉजरला प्रचंड राग आला. त्याच्याजागी आपण असतो तर त्या बाईला खडसावलं असतं, तिची तक्रार केली असती. पण स्ट्रॉजर हा मुळात संशोधक वृत्तीचा माणूस असल्याने त्याने या प्रश्नाकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं.
त्याने ठरवलं की आता अशी यंत्रणा शोधून काढायची की त्या बाईचं कामच संपेल.

त्याने ऑटोमॅटिक टेलिफोन एक्सचेंज ची कल्पना मांडली.
जिथे कॉल थेट हव्या त्या व्यक्तीकडे जाईल—मध्येमध्ये कोणी कॉल वळवू शकणार नाही.

खूप खटाटोप करून त्याने एक छोटं बेसिक मॉडेल बनवलं. त्याकाळात इलेक्ट्रॉनिक्स स्विचेस नव्हते.
हे पूर्णपणे यांत्रिक (mechanical) असल्याने अनेक भागांना हलावं लागत होतं, त्यामुळे प्रक्रिया थोडी धीमी होती.यावर उपायही स्ट्रॉजरनेच शोधला. त्याने रोटरी डायल शोधला, ज्यामुळे कॉल आपोआप योग्य नंबरकडे जाऊ शकत होते. त्यावेळी एका रोटरवर 10 कनेक्शन्स बसवता येत, त्यामुळे 10 × 10 = 100 एक्स्टेंशन्स मिळू शकत होते. (रोटरी डायल म्हणजे आपण जुन्या चित्रपटात पाहिलेला प्रत्येक आकड्यासाठी गोल डायल फिरवावा लागणारा फोन !)

1891 मध्ये त्याला पेटंट मिळालं.1892 मध्ये इंडियाना राज्यातील ला पोर्ट (La Porte) शहरात पहिलं ऑटोमॅटिक टेलिफोन एक्सचेंज बसवण्यात आलं.
आणि अगदी खरंच, या शोधामुळे त्या undertaker ची पत्नी आणि बाकी सर्व टेलिफोन ऑपरेटरचं कामच कायमचं संपून गेलं.

स्ट्रॉजरने आपल्या जाहिरातीमध्ये हेच सांगितलं :
“Girl-less. Cuss-less. Out-of-order-less. Wait-less.” (“मुलीशिवाय. शिवीशिवाय. बिघाडाशिवाय. प्रतीक्षेशिवाय.”)

1916 मध्ये त्याचं पेटंट बेल सिस्टिम्स (Bell Systems) ने विकत घेतलं.
पुढे हीच कंपनी Bell Telephone Company झाली आणि नंतर अमेरिकेतील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी AT&T बनली. स्ट्रॉजरने तयार केलेले उपकरण आजही वॉशिंग्टन येथील SPARK म्युझिअममध्ये पाहता येते. आणि त्याचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर उपलब्ध आहे.

मित्रांनो, समस्या आली की आपण रागावतो, दोष देतो किंवा हार मानतो. पण खरी वाढ (growth) तेव्हाच होते जेव्हा आपण म्हणतो:
“मी याबद्दल काय वेगळं करू शकतो ? / मी यावरून काय नवीन तयार करू शकतो?”
संकटात लपलेली संधी ओळखणे, त्यावर कृती करणे आणि दीर्घकालीन परिणाम साधणे — हीच खरी प्रगती आहे.

एका अंडरटेकरने व्यावसायिक प्रश्न सोडविण्यासाठी एक संपूर्ण उद्योगक्षेत्रच कायमचं बदलून टाकलं त्याची ही गोष्ट !…

(संकलन -श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय, उरण.)
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )