Run, Operate and Manage by Kapil Patil Educational Institute | UGC Recognised as 2(f) 12(B) | Permanently Affiliated to University of Mumbai | Re-accredited 'B' Grade by NAAC (3rd cycle) | AISHE code 34145
आज आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथे जग पूर्णपणे बदलण्याच्या तयारी आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये जेव्हा आपण ‘को*विड’बद्दल ऐकत होतो, तेव्हा कोणालाच वाटले नव्हते की पुढच्या ३ आठवड्यांत संपूर्ण जग ठप्प होईल. मॅट शुमर (Matt Shumer), जे ‘HyperWrite’ या प्रसिद्ध AI कंपनीचे CEO आहेत, त्यांच्या मते आपण सध्या AI च्या बाबतीत त्याच टप्प्यावर आहोत.
मॅट शुमर हे गेल्या ६ वर्षांपासून AI क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांनी अनेक यशस्वी AI प्रॉडक्ट्स तयार केले आहेत. अलीकडेच त्यांनी “Something Big Is Happening” (काहीतरी खूप मोठे घडत आहे…) नावाचा एक लेख लिहिला, जो अवघ्या चोवीस तासात चार कोटीहून जास्त लोकांनी वाचला. त्या लेखातील काही महत्वाचे मुद्दे वाचकांसाठी येथे मांडत आहे.
=====================================================
माझ्या मित्रांनो, आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथे जग पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत आहे. फेब्रुवारी २०२० ची आठवण करून पहा. जर तुम्ही बारकाईने लक्ष दिले असेल, तर परदेशात एक व्हायरस पसरतोय यावर काही लोक चर्चा करताना दिसले असतील. पण आपल्यापैकी बहुतेकांचे त्याकडे लक्ष नव्हते. स्टॉक मार्केट तेजीत होते, तुमची मुले शाळेत जात होती, तुम्ही सहलींचे नियोजन करत होता. तेव्हा जर कोणी तुम्हाला सांगितले असते की लोक टॉयलेट पेपरचा साठा करत आहेत, तर तुम्हाला ते वेडे वाटले असते. पण फक्त तीन आठवड्यांत संपूर्ण जग बदलले. तुमची ऑफिसं बंद झाली आणि आयुष्य असे काही बदलले ज्यावर एक महिना आधी तुमचा स्वतःचाही विश्वास बसला नसता.
मी आज हे सर्व तुम्हाला सांगतोय कारण मी गेल्या सहा वर्षांपासून AI स्टार्टअप्स उभारत आहे आणि या क्षेत्रात गुंतवणूक करत आहे. मी या जगात वावरतोय. माझे कुटुंब, मित्र आणि ज्यांची मी काळजी करतो अशा लोकांसाठी मी हे लिहितोय, कारण मला त्यांना साध्या ‘कॉकटेल पार्टी’मधील उत्तरांपेक्षा खरे सत्य सांगायचे आहे. सत्य हे आहे की, आपण सध्या एका अशा ‘दिसण्यापेक्षा मोठा’ असलेल्या लाटेच्या टप्प्यावर आहोत, जी कोविडपेक्षाही अधिक प्रभावी ठरणार आहे.
मी AI क्षेत्रात काम करत असलो तरी, भविष्यात काय घडणार आहे यावर माझे किंवा या उद्योगातील बहुतेकांचे कोणतेही नियंत्रण नाही. हे भविष्य केवळ काही मोजक्या कंपन्यांमधील (OpenAI, Anthropic, Google DeepMind) काही शंभर संशोधकांकडून घडवले जात आहे. आम्ही फक्त या जमिनीला बसणारे धक्के सर्वात आधी अनुभवतोय.
मला हे सर्व इतके खात्रीने सांगता येतेय कारण हे माझ्या स्वतःच्या बाबतीत आधी घडले आहे. तंत्रज्ञान क्षेत्राबाहेरील लोकांना हे अद्याप उमजलेले नाही की, आम्ही फक्त भाकिते करत नाही आहोत, तर आमच्या स्वतःच्या नोकऱ्यांमध्ये जे घडले आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला सावध करत आहोत. पूर्वी AI हळूहळू प्रगती करत होते, पण २०२५ पासून प्रगतीचा वेग इतका प्रचंड वाढला की प्रत्येक नवीन मॉडेल आधीच्या मॉडेलपेक्षा खूप पटीने सरस ठरू लागले. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जेव्हा GPT-5.3 Codex आणि Claude Opus 4.6 लाँच झाले, तेव्हा मला जाणीव झाली की पाणी आता छातीपर्यंत आले आहे
.
आता मला माझ्या कामात तांत्रिक मदतीची गरज उरलेली नाही. मी फक्त साध्या इंग्रजी भाषेत मला काय हवे आहे ते लिहितो आणि ते काम आपोआप पूर्ण होते. हे केवळ एक कच्चा मसुदा नसून, मी स्वतः केले असते त्यापेक्षाही दर्जेदार काम AI करतेय. गेल्या काही महिन्यांपर्यंत मला AI ला वारंवार सूचना द्याव्या लागायच्या, चुका सुधाराव्या लागायच्या. पण आता तसे नाही. मी फक्त कामाचे स्वरूप सांगतो, संगणकापासून चार तास लांब जातो आणि परत येतो तेव्हा काम १००% पूर्ण झालेले असते. AI कडे आता केवळ माहिती नाही, तर ‘जजमेंट’ आणि ‘टेस्ट’ (अभिरुची) देखील आली आहे
.
याचा एक प्रॅक्टिकल अनुभव मी तुम्हाला देतो. मी AI ला सांगतो, “मला हे अॅप बनवायचे आहे, त्याचे स्वरूप असे असावे.” आणि ते AI हजारो ओळींचे कोड लिहिते. एवढेच नाही, तर ते स्वतः अॅप उघडून पाहते, बटणांवर क्लिक करते, एखाद्या माणसाप्रमाणे त्याची चाचणी घेते. जर त्याला एखादी गोष्ट आवडली नाही, तर ते स्वतःहून त्यात सुधारणा करते. जेव्हा ते मला सांगते की “अॅप तयार आहे”, तेव्हा ते सहसा परिपूर्ण असते.
हे सर्व इतक्या वेगाने का घडतेय? कारण AI आता स्वतःलाच तयार करण्यात मदत करत आहे. GPT-5.3 Codex हे पहिले मॉडेल आहे ज्याने स्वतःला विकसित करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. जसा जसा हा ‘फीडबॅक लूप’ फिरतोय, तसा तसा प्रगतीचा वेग वाढत चालला आहे. याला संशोधक ‘इंटेलिजन्स एक्सप्लोजन’ (बुद्धिमत्तेचा स्फोट) म्हणत आहेत. २०२७ पर्यंत आपल्याकडे अशा सिस्टिम्स असतील ज्या जवळपास प्रत्येक कामात कोणत्याही माणसापेक्षा अधिक हुशार असतील.
येणाऱ्या काळात याचा नोकऱ्यांवर प्रचंड परिणाम होणार आहे. अँथ्रोपिकचे CEO डारियो अमोदेई यांनी भाकीत केले आहे की ५०% एन्ट्री-लेव्हल व्हाईट कॉलर नोकऱ्या येत्या १ ते ५ वर्षात नष्ट होतील. हे कोणत्याही मागील ऑटोमेशनपेक्षा वेगळे आहे कारण AI हे केवळ एक कौशल्य नाही, तर ते मानवी बुद्धिमत्तेचाच पर्याय बनत आहे. कायदा, वित्त, औषधोपचार, अकाऊंटिंग किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग—यांपैकी काहीही यातून सुटणार नाही.
या सर्वांचा अर्थ असा नाही की आपण हतबल व्हावे. पण आता सावध होण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही आजही मोफत AI टूल्स वापरत असाल, तर तुम्ही जगाच्या तुलनेत एक वर्ष मागे आहात. तुम्हाला खरोखरच या लाटेवर स्वार व्हायचे असेल, तर पेड व्हर्जन्स वापरा आणि रोज किमान एक तास या टूल्ससोबत घालवा. जो माणूस ३ दिवसांचे काम १ तासात करून दाखवेल, तोच या नवीन युगात टिकून राहील. हा काळ भीतीचा नाही, तर स्वतःला अपडेट करण्याचा आहे. लक्षात ठेवा, हे तंत्रज्ञान आता थांबणार नाही, ते फक्त अधिक वेगवान होणार आहे.
हेन्री फोर्ड याची थॉमस एडिसन बरोबर खूप जुनी मैत्री होती. थॉमस एडिसन फोर्ड पेक्षा सोळा वर्ष मोठा होता आणि तरीसुद्धा त्यांच्यात मैत्री होती. दोघेही आपापल्या क्षेत्रातले मान्यवर होते आणि तरीसुद्धा फोर्ड नेहमी एडिसनला आपला मार्गदर्शक मानत असे.
फोर्ड जेव्हा आपल्या ऑटोमोबाईल इंजिन डिझाईनवर काम करत होता तेव्हा त्याने एडिसनला सल्ला विचारला. एका रात्री जेवताना फोर्डने आपल्या मनातली गॅसोलीन वर चालणाऱ्या इंजिनची कल्पना एडिसनला सांगितली.
एडीसनने शांतपणे कॉन्सेप्ट ऐकून घेतला, आणि त्यानंतर टेबलावर जोरात हात आपटत उत्साहात म्हणाला young man, that’s the thing. You have it !
ही एकमेव घटना नव्हती. महत्त्वाच्या मार्गदर्शनासाठी आणि एडिसनचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी फोर्ड बऱ्याच वेळा त्याला भेटत असे. ते बऱ्याचदा एकत्र कॅम्पिंग ट्रिप पण करत असत.
मित्रांनो, यातून आपण काय शिकू शकतो? जगातील सगळ्यात हुशार व्यक्तीमत्वांनी देखील सल्ला मागण्यासाठी, दुसऱ्यांचा वेगळा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. एकाच व्यक्तीकडे सगळी उत्तरं कधीच नसतात. तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे कधीच नसतील. आणि म्हणून योग्य माणसाचा सल्ला जाणून घेणे गरजेचे आहे.
सध्याच्या युगात जग दिवसेंदिवस कॉम्प्लेक्स होत चाललं आहे. जसा फोर्डला एडिसन सारखा मेंटर मिळाला तसा मेंटर, सल्लागार, मदत करणारा मित्र किंवा प्रोफेशनल कन्सल्टंट नक्कीच खूप उपयोगी ठरू शकतो.
प्रयत्नपूर्वक अशा लोकांची यादी बनवा ज्यांना तुम्ही सल्ला विचारू शकता. त्यांच्या संपर्कात रहा. त्यांची मदत मागा. गरज लागल्यास त्यासाठी फी द्यायला तयार व्हा. त्याचा तुम्हाला खूप खूप फायदा होईल.
आता तुम्ही या जगात नसलात, तरी तुमचं सोशल मीडिया अकाउंट ‘ऍक्टिव्ह’ राहू शकतं. हे तंत्रज्ञान तुमच्या आजवरच्या पोस्ट, मेसेजेस, बोलण्याची पद्धत आणि ऑनलाईन सवयींचा अभ्यास करून एक असा AI तयार करेल, जो तुमच्या निधनानंतरही तुमच्या वतीने पोस्ट करू शकेल, मेसेजला उत्तर देऊ शकेल आणि हुबेहूब तुमच्यासारखे व्हिडीओ कॉल्सही करू शकेल.
अर्थात, हे सध्या फक्त एक पेटंट आहे. टेक कंपन्या अनेकदा अशा अतरंगी संकल्पनांची नोंदणी करून ठेवतात, ज्याचा अर्थ असा नाही की ही सुविधा उद्याच सुरू होईल. पण असा विचार कागदावर उतरणं हेच मुळात अस्वस्थ करणारं आहे.
कदाचित काही लोक त्यांच्या डिजिटल आठवणी जपण्यासाठी याची संमती देतील. काही लोकांना आपल्या जीवाभावाच्या माणसांसोबत virtually संवाद साधता येईल
ही त्यांच्यासाठी एक समाधानाची गोष्ट असली तरीही तंत्रज्ञान आणि माणूस यातील सीमारेषा यामुळे पुसली जाण्याची भीती आहे.
मरणानंतरही एखाद्याचं अकाउंट फक्त ‘एन्गेजमेंट’ वाढवण्यासाठी वापरलं जाणं, हे नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे हा मोठा प्रश्न आहे. यातूनच ‘डेड इंटरनेट थिअरी’ (Dead Internet Theory) अधिक प्रकर्षाने चर्चेत येत आहे.
ही एक अशी भीतीदायक संकल्पना आहे ज्यानुसार, आज आपण इंटरनेटवर जे काही पाहतो, वाचतो किंवा ज्यांच्याशी संवाद साधतो, त्यातील बहुतांश भाग हा मानवी नसून ‘बॉट्स’ किंवा ‘AI’ द्वारे नियंत्रित आहे. आताच इंटरनेटवरील साधारण ५ ० % ट्रॅफिक ही बॉट्स कडून येत आहे.
जर मृतांच्या नावाखाली AI च पोस्ट करू लागलं, तर इंटरनेटवर खऱ्या माणसांचा वावर संपून जाईल आणि फक्त अल्गोरिदम एकमेकांशी संवाद साधताना दिसतील. थोडक्यात, इंटरनेट हे ‘जिवंत’ माणसांचे माध्यम न राहता केवळ मशिनरीचा खेळ बनेल.
मृतातून संवाद साधून ‘एन्गेजमेंट फार्मिंग’ करणं हा प्रकार खरंच काळजाचा ठोका चुकवणारा आहे. तंत्रज्ञानाचा हा अतिरेक माणसाला कायमचं विस्मृतीत ढकलणार की काय, ही टेक्नोलॉजी माणसासाठी वरदान ठरेल की शाप? ही भीती निर्माण झाली आहे.
आपल्याला शाळाकॉलेजेसमध्ये सगळे विषय शिकवतात पण जीवनावश्यक असलेलं आर्थिक नियोजन मात्र आपल्याला कोणीही शिकवत नाही, त्यासाठी स्वतःला ओळखून स्वतःच्या आर्थिक गरजा आणि आपले एकूण उत्पन्नाच्या तूलनेत होणारे खर्च, आपल्यावरील आर्थिक जबाबदारी या सर्वांचा सर्वंकश विचार करून मग आपल्याला हे स्वतःचं गणित बसवावं लागतं. मात्र, अनेकांना हेच गणित कसं बसवायचं ते लक्षात येत नाही. म्हणूनच, आज अशा सर्वांसाठी हा लेख, ज्यांना आर्थिक नियोजनाची घडी व्यवस्थित बसवायची आहे, त्यांनी या मुद्द्यांचा जरूर विचार करावा –
1. स्वनियंत्रण ठेवायला शिका –
स्वतःवरती नियंत्रण ठेवण्याची एक कलाच आहे खरंतर, आणि ही कला ज्यांनी जितक्या लवकर आत्मसात केली त्यांची आर्थिक बाजू तितक्या लवकर बळकट झाली असं एक निरीक्षण आहे. कसं ते बघा हं, हल्ली आपण फटाफट क्रेडीट कार्ड किंवा ऑनलाईन पेमेंटने वाट्टेल तशी शॉपिंग करतो, त्यात बरीच खरेदी ही अकारणच केलेली अनावश्यक अशी असते. तुम्ही जर नंतर बँक स्टेटमेंट काळजीपूर्वक पाहिलंत तर तुम्हालाही ते जाणवेल. क्रेडीट कार्डवरून घरबसल्या विनाकष्ट शॉपिंग करणं हे इतकं सोपं झालंय की प्रत्यक्षात हीच वस्तू आणण्यासाठी किती खर्च झाला असता ते कष्ट आपण लक्षातही घेत नाही आणि भराभर स्वॅप करत आपली हौस पुरवत जातो. म्हणूनच मित्रांनो, खर्चाच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका.
मग हे नियंत्रण कसं ठेवायचं, कसं कळेल की कोणता खर्च आवश्यक आहे आणि कोणता अनावश्यक ..?
तर त्यासाठी Timothy Keller चं हे वाक्य लक्षात ठेवा – ” Self control is the ability to do the important thing over the urgent “
2. तुमचं आर्थिक भविष्य कसं असेल याचा विचार करा –
जर तुम्ही अव्वाच्यासव्वा खर्च करत राहिलात आणि त्या तुलनेत तुमचं इनकम फारसं नसेल तर तुमचं आर्थिक भविष्य कसं असेल याचा एकदा विचार करून पहा. जर तुम्हाला आर्थिक नियोजन कसं करावं याविषयी अजिबात माहिती नसेल तर काही पुस्तकं वाचा, अभ्यास करा. लक्षात घ्या, दर वीकेंडला पैसे उडवणाऱा उनाड तरूण आणि आर्थिक नियोजन करणारा एक जबाबदार तरूण या दोन्हीही व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःच, पण एकाच वेळी तुम्ही या दोन्हीही व्यक्ती होऊ शकणार नाही.. हे लक्षात घ्या.
3. पैशाच्या वाटा शोधा –
आपल्याकडे एक म्हण आहे, ‘आय पाहून व्यय करावा ..!’ म्हणजे काय की तुमचं अर्थार्जन जितकं आहे त्या तुलनेतच किंबहुना त्यापेक्षा कमी खर्च करावा, पण बरेचदा हे शक्य होत नाही कारण आपल्याकडे पैसा येण्यापूर्वीच तो कुठे कुठे खर्च करायचाय याचं नियोजन झालेलं असतं. मग हा बॅलन्स कसा साधायचा, तर त्यासाठीच पैशाच्या वाटा शोधा.. म्हणजे पैसा नेमका कुठे कुठे खर्च होणार आहे ते आधी एका कागदावर लिहून काढा आणि मग त्यातील अनावश्यक ठिकाणी खर्च होत असलेल्या पैशाच्या मार्गांवर फुली मारून टाका.. नुसती कागदावरच नव्हे तर प्रत्यक्षातही बरं का ..!
4. तात्काळ खर्चासाठी काही रक्कम पूर्वनियोजित वेगळी काढून ठेवा –
आपण कितीही प्लॅन केलं तरीही आर्थिक गणित नीट बसतंच असं नाही, याचं कारण अचानक, तात्काळ उद्भवणारे खर्च. कधी अपघातासाठी, कधी अचानक आजारपणं, कधी लग्नमुंजी, कधी अचानक आलेले पाहुणे .. अशा हज्जारो गोष्टी ज्या आपल्या नियोजनात नसतात पण ऐनवेळी हे खर्च निघतात, म्हणून त्यासाठी दरमहा काही रक्कम बाजूला काढून ठेवत चला. बँकेत तुम्ही अशा काही रकमेच्या एफडीसुद्धा करून ठेऊ शकता.
5. निवृत्ती नंतरचं आर्थिक नियोजन –
नोकरी करणाऱ्यांसाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. निवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन आधीच करून ठेवायला हवं. कारण, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी पैसे मागायला कोणापुढेही हात पसरावे लागले नाही पाहिजेत हे लक्षात ठेवा, या जगात आपल्याजवळ पैसा असतो तोवरच आपल्याला किंमत असते ही काहीशी दुःखद पण खरी गोष्ट आहे. म्हणून, आज जे कमावताय त्यातलेच पैसे वृद्धापकाळासाठी बाजूला ठेवायला लागा. वॉरेन बफेट तर म्हणतात, “Spend what is left after saving.”
6. कर भरण्याला गांभीर्याने घ्या –
अनेकदा आपण टॅक्स भरण्याला फारसं महत्त्व देत नाही, परंतु, त्याकडे लक्ष देणं, आपला टॅक्स किती आणि कसा कधी भरावा लागेल या सगळ्याबाबत माहिती असणं हे सगळं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते जमत नसल्यास ऑनलाईन टॅक्स कॅलक्यूलेटर्स वापरू शकता.
7. आरोग्याची काळजी घ्या –
आता तुम्ही म्हणाल, अचानक हे काय.. तर खरंय मित्रांनो, ‘Health is wealth’ असं म्हणतात ते खरंच आहे. स्वतःची काळजी घेतली नाहीत तर सगळा पैसा सतत दवाखान्यांमध्येच खर्च होत राहील म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
(संकलन – श्याम धारासूरकर, लायब्ररिअन, उरण महाविद्यालय, उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles )
सवयीनुसार, तुम्ही एकतर उजवा बूट आधी घालता किंवा डावा. सवयीनुसार, तुम्ही बुटाची लेस बांधताना उजव्या हाताकडील लेस डाव्या बाजूच्या लेसच्या मागून घेता किंवा याच्या उलट करता. उद्या सकाळी लक्षपूर्वक पहा की तुम्ही कोणता बूट आधी घालता आणि लेस कशी बांधता. आता जाणीवपूर्वक असा निर्णय घ्या की, पुढील २१ दिवस तुम्ही दुसरा बूट (नेहमीच्या विरुद्ध पायाचा) आधी घालून आणि वेगळ्या पद्धतीने लेस बांधून एक नवीन सवय लावणार आहात. दररोज सकाळी, जेव्हा तुम्ही अशा विशिष्ट पद्धतीने बूट घालण्याचे ठरवाल, तेव्हा ही साधी कृती तुम्हाला त्या दिवसभरातील विचार करण्याच्या, वागण्याच्या आणि अनुभवण्याच्या इतर जुन्या सवयी बदलण्यासाठीची एक ‘आठवण’ (Reminder) ठरू दे.बुटाची लेस बांधताना स्वतःला सांगा, ‘मी दिवसाची सुरुवात एका नवीन आणि चांगल्या पद्धतीने करत आहे.’ त्यानंतर, जाणीवपूर्वक ठरवा की दिवसभर:
१. मी शक्य तितका प्रसन्न (Cheerful) राहीन.
२. मी इतर लोकांशी थोडे अधिक मैत्रीपूर्ण वागण्याचा आणि तशी भावना ठेवण्याचा प्रयत्न करेन.
३. मी इतरांवर टीका करणे थोडे कमी करेन आणि त्यांच्या दोषांबद्दल, उणिवांबद्दल आणि चुकांबद्दल थोडा अधिक सहनशील होईन. त्यांच्या कृतींचा मी शक्य तितका ‘चांगला’ अर्थ लावेन (त्यांच्या वागण्यामागे वाईट हेतू न शोधता चांगला हेतू शोधेन).
४. ‘यश हे अपरिहार्य आहे’ (ते नक्की मिळणारच आहे) आणि मला ज्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व बनायचे आहे, तसा मी आधीच आहे, असे समजून मी वागेन. “मी जसा असायला हवे होते, तसा मी आधीच आहे” या भावनेचा मी सराव करेन.
५. मी माझ्या स्वतःच्या मतांमुळे तथ्यांना (Facts) किंवा घटनांना निराशावादी किंवा नकारात्मक रंग देणार नाही.
६. मी दिवसातून किमान तीन वेळा तरी हसण्याचा (स्मितहास्य करण्याचा) सराव करेन.
७. काहीही घडले, तरी मी शक्य तितक्या शांतपणे आणि समंजसपणे प्रतिक्रिया देईन.
८. ज्या निराशावादी आणि नकारात्मक ‘तथ्यांमध्ये’ (परिस्थितीत) मी काहीही बदल करू शकत नाही, त्यांच्याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन आणि त्यांच्यासाठी माझे मन बंद करेन.
हे सोपे आहे का? तर होय. पण वागणे, अनुभवणे आणि विचार करणे या, वर दिलेल्या प्रत्येक सवयीचा तुमच्या ‘आत्म प्रतिमेवर’ (Self-image) एक फायदेशीर आणि रचनात्मक प्रभाव नक्कीच पडतो. २१ दिवस याप्रमाणे कृती करून पहा. त्यांचा प्रत्यक्ष “अनुभव” घ्या, आणि पहा की तुमची चिंता, अपराधीपणाची भावना आणि इतरांबद्दलची कटुता कमी झाली आहे की नाही; तसेच तुमचा आत्मविश्वास वाढला आहे की नाही.
( मॅक्सवेल माल्ट्झ लिखित सायको सायबरनेटिक्स या पुस्तकातून )