Run, Operate and Manage by Kapil Patil Educational Institute | UGC Recognised as 2(f) 12(B) | Permanently Affiliated to University of Mumbai | Re-accredited 'B' Grade by NAAC (3rd cycle) | AISHE code 34145
श्वेता ऑफिसला जायला निघाली, तेव्हा सगळंच विपरीत घडत होतं. आधी अलार्म उशीरा वाजला, मग गाडीत पेट्रोल संपलं, आणि त्यात भर म्हणून त्या दिवशी ट्रॅफिकही ! ऑफिसमध्ये उशिरा आल्याबद्दल बॉसची बोलणी खावी लागतील याची भीती, ट्रॅफिकचा राग आणि स्वतःबद्दलची चिडचिड या भावनांचा एकत्रित कल्लोळ झाला होता. त्यात आणखीन भर म्हणून अचानक हलकासा पाऊस सुरू झाला. आणि तिचा मूड आणखीनच बिघडला.
आता गाडीत बसून राहण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. श्वेताने गाडीत रेडिओ सुरू केला. पहिलंच गाणं लागलं “सावन बरसे तरसे दिल…क्यो ना निकले घर से दिल”….त्या दोन ओळींनी श्वेताच्या विचारांची दिशा आपोआप बदलली. तिने चक्क दार उघडलं आणि पावसाचा आनंद घेत पाच मिनिटे चालून आली. त्या थंड पावसाच्या थेंबांनी तिचा मूड एकदम बदलून गेला. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि दिवसाची सुरुवात पूर्णपणे बदलली.
ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे आपला मूड बदलण्यासाठी नेहमीच मोठ्या गोष्टींची गरज नसते. काही सोप्या पद्धतींनी आपण आपला वाईट मूड चटकन बदलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या पद्धती…या सर्व पद्धती वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहेत.
१. *शारीरिक हालचाल*
फक्त ५ मिनिटं चालणं किंवा थोडी स्ट्रेचिंग करणं यामुळे आपल्या शरीरात एंडॉर्फिन्स नावाचे रसायन निर्माण होतात. हे ‘हॅपी हार्मोन्स’ आपला मूड चटकन बदलू शकतात. संशोधनानुसार, हलका व्यायाम करणं हे सौम्य डिप्रेशनवर औषधांइतकंच प्रभावी ठरतं.
२. *योग्य श्वासोच्छ्वास*
श्वासोच्छ्वासाचे ४-७-८ श्वास तंत्र वापरा. ४ सेकंद श्वास घ्या, ७ सेकंद रोखून धरा, आणि ८ सेकंद श्वास सोडा. हे तंत्र आपल्या मेंदूला शांत करतं आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी करतं. फक्त २-३ मिनिटांत आपल्याला फरक जाणवू शकतो.
३. *वातावरण बदला*
बाहेर जा आणि नैसर्गिक प्रकाशात थोडा वेळ घालवा. यामुळे सेरोटोनिन वाढतं.
दुसऱ्या खोलीत जा. अगदी छोटासा बदल देखील मूड बदलण्यास मदत करतो.
निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवा, याचा सकारात्मक प्रभाव लगेचच आपल्या मूड वर दिसून येतो.
४. *संगीताचा वापर*
आवडतं, उत्साही संगीत ऐका. २-३ मिनिटं संगीत ऐकल्याने डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढतं.
गाणं म्हणा किंवा गुणगुणा. यामुळे व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेट होते आणि शरीर रिलॅक्स होतं.
५. *सामाजिक संपर्क*
मित्र किंवा कुटुंबीयांना फोन करा किंवा चॅट करा. यामुळे ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन वाढतं.
छोट्याशा सकारात्मक संभाषणाने देखील मूड बदलू शकतो.
६. *संवेदना रीसेट करा*
चेहऱ्यावर थंड पाणी मारा (डायव्हिंग रिफ्लेक्स सक्रिय होतो)
अरोमाथेरपी वापरा (लॅव्हेंडर किंवा चिट्रसचा गंध मूड सुधारतो)
बर्फाचा तुकडा हातात धरा किंवा थंड पाण्याने आंघोळ करा.
लक्षात ठेवा, आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा त्यावरील प्रतिक्रिया बदलणे हेच आपल्या हिताचे असते.
वरील सर्व टिप्स प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टी काम करू शकतात. म्हणून वेगवेगळ्या पद्धती वापरून बघा आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे ते शोधा.तसेच या वैज्ञानिक संशोधनावर आधारित असल्या तरी, त्या वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाहीत. गंभीर मानसिक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
राहा आनंदी… Be happy… 😄
(संकलन- श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण)
लायब्ररी हेल्प लाईन नंबर 9892798322
(Please visit library-blog for more articles)