मार्क झुकरबर्गच्या Meta कंपनीने नुकतंच एक असं पेटंट मिळवलं आहे जे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल.

आता तुम्ही या जगात नसलात, तरी तुमचं सोशल मीडिया अकाउंट ‘ऍक्टिव्ह’ राहू शकतं. हे तंत्रज्ञान तुमच्या आजवरच्या पोस्ट, मेसेजेस, बोलण्याची पद्धत आणि ऑनलाईन सवयींचा अभ्यास करून एक असा AI तयार करेल, जो तुमच्या निधनानंतरही तुमच्या वतीने पोस्ट करू शकेल, मेसेजला उत्तर देऊ शकेल आणि हुबेहूब तुमच्यासारखे व्हिडीओ कॉल्सही करू शकेल.

अर्थात, हे सध्या फक्त एक पेटंट आहे. टेक कंपन्या अनेकदा अशा अतरंगी संकल्पनांची नोंदणी करून ठेवतात, ज्याचा अर्थ असा नाही की ही सुविधा उद्याच सुरू होईल. पण असा विचार कागदावर उतरणं हेच मुळात अस्वस्थ करणारं आहे.

कदाचित काही लोक त्यांच्या डिजिटल आठवणी जपण्यासाठी याची संमती देतील. काही लोकांना आपल्या जीवाभावाच्या माणसांसोबत virtually संवाद साधता येईल

ही त्यांच्यासाठी एक समाधानाची गोष्ट असली तरीही तंत्रज्ञान आणि माणूस यातील सीमारेषा यामुळे पुसली जाण्याची भीती आहे.

मरणानंतरही एखाद्याचं अकाउंट फक्त ‘एन्गेजमेंट’ वाढवण्यासाठी वापरलं जाणं, हे नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे हा मोठा प्रश्न आहे. यातूनच ‘डेड इंटरनेट थिअरी’ (Dead Internet Theory) अधिक प्रकर्षाने चर्चेत येत आहे.
ही एक अशी भीतीदायक संकल्पना आहे ज्यानुसार, आज आपण इंटरनेटवर जे काही पाहतो, वाचतो किंवा ज्यांच्याशी संवाद साधतो, त्यातील बहुतांश भाग हा मानवी नसून ‘बॉट्स’ किंवा ‘AI’ द्वारे नियंत्रित आहे. आताच इंटरनेटवरील साधारण ५ ० % ट्रॅफिक ही बॉट्स कडून येत आहे.

जर मृतांच्या नावाखाली AI च पोस्ट करू लागलं, तर इंटरनेटवर खऱ्या माणसांचा वावर संपून जाईल आणि फक्त अल्गोरिदम एकमेकांशी संवाद साधताना दिसतील. थोडक्यात, इंटरनेट हे ‘जिवंत’ माणसांचे माध्यम न राहता केवळ मशिनरीचा खेळ बनेल.

मृतातून संवाद साधून ‘एन्गेजमेंट फार्मिंग’ करणं हा प्रकार खरंच काळजाचा ठोका चुकवणारा आहे. तंत्रज्ञानाचा हा अतिरेक माणसाला कायमचं विस्मृतीत ढकलणार की काय, ही टेक्नोलॉजी माणसासाठी वरदान ठरेल की शाप? ही भीती निर्माण झाली आहे.

(संकलन – श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )
लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322